‘म्हैसाळ’चे सव्वादोन कोटी वसूल

By admin | Published: February 13, 2016 12:17 AM2016-02-13T00:17:27+5:302016-02-13T00:26:10+5:30

आवर्तनाची साशंकता कायम : थकबाकी भरण्यासाठी शेतकरी सरसावला

'Mhaysal' is worth Rs | ‘म्हैसाळ’चे सव्वादोन कोटी वसूल

‘म्हैसाळ’चे सव्वादोन कोटी वसूल

Next

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाविषयी निर्माण झालेला थकबाकी वसुलीचा तिढा सुटण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. सांगलीच्या वसंतदादा व कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्यांनी प्रत्येकी एक कोटी दिल्यानंतर आतापर्यंत २ कोटी २६ लाखांची वसुली झाली आहे. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेल्या पाच कोटींचा टप्पा पार करण्यास अजून वसुलीची गरज असल्याने अजून तरी आवर्तन सुरू होण्याची शक्यता नाही. मात्र, आता शेतकऱ्यांनीच पुढाकार घेत वसुलीस प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.
म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील ‘त्या’ भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने आवर्तन सुरू करण्याची मागणी वाढत असताना गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे, पैसे भरले तरच पाणी सोडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता वसुलीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर उशिरा का होईना वसंतदादा कारखाना व महांकाली कारखान्याने प्रत्येकी एक कोटीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरल्याने थकबाकीचा आकडा बऱ्यापैकी कमी आला आहे. त्यात पाटबंधारे विभागाने आतापर्यंत २२ लाखांची वसुली केली होती.
शुक्रवारी लिंगनूर येथून ३ लाख रुपये थकबाकीपोटी भरण्यात आले आहेत, तर ‘क्रांती’चे अध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी वैयक्तिक एक लाखाची मदत केली आहे. अशी शुक्रवारअखेर २ कोटी २५ लाख ६६ हजार ५६९ रुपयांची वसुली झाली आहे. आता आवर्तन सुरू होण्याची शक्यता टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांनीही थकबाकी भरण्यास सुरुवात केल्याचे दिलासादायक चित्र आहे. वसुली अशीच कायम राहिल्यास आठवडाभरात पाणी सुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)


अरुण लाड यांचे एक लाख; अवधूत ट्रेडर्सचे दोन हजार
थकबाकी भरण्यासाठी ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. याचवेळी ‘म्हैसाळ’शी अर्थाअर्थी संबंध नसणाऱ्या कुंडल येथील अवधूत ट्रेडर्सच्यावतीने दोन हजार रुपयांचा धनादेश शुक्रवारी ‘पाटबंधारे’कडे जमा करण्यात आला. रक्कम छोटी असली तरी त्यांनी दाखविलेल्या आस्थेचे मोल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा धडा घेत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनीही वसुलीस प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले. आजच अरुणअण्णा लाड यांनीही जाहीर केल्याप्रमाणे वैयक्तिक एक लाख रुपयांचा धनादेश जमा केला आहे. योजनेशी काहीही संबंध नसताना लाड व अवधूत ट्रेडर्स यांनी दाखविलेल्या या औदार्याची जोरदार चर्चा आहे.

Web Title: 'Mhaysal' is worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.