एमआयडीसी कार्यालय स्थलांतर रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:15 AM2017-09-11T00:15:26+5:302017-09-11T00:15:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाचे सांगलीतील विभागीय कार्यालय सोलापूरला हलविण्याबरोबरच हा जिल्हा कोल्हापूरला जोडण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या निर्णयाविरोधात सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा औद्योगिक वसाहत आणि गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांना हा निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले आहे. तसेच उद्योग विकास आघाडी या संघटनेने या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे तीव्र पडसाद जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीवरही पडणार आहेत.
जिल्ह्यात औद्योगिक महामंडळाच्या क्षेत्राची स्थापना १९७३ च्या दरम्यान झाली. त्यावेळेपासून या जिल्ह्यातील उद्योजकांना कोल्हापूर विभागीय कार्यालयात कामासाठी हेलपाटे घालावे लागत होते. त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तत्कालिन उद्योगमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी २००० मध्ये सांगलीतील विश्रामबागमध्ये या जिल्ह्याबरोबरच सोलापूरसाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. याठिकाणी येण्यासाठी सोलापूरच्या उद्योजकांना नाहक त्रास होत असल्याच्या कारणावरून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी हे कार्यालय सोलापूरला हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुंबईत मंत्रालयात बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी ११ वाजता बैठक बोलाविली आहे.
याप्रकरणी सर्वप्रथम ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर उद्योजकांतून या निर्णयाबद्दल संतप्त पडसाद उमटले. या निर्णयाविरोधात उद्योग विकास आघाडी या उद्योजक संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योग आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान आदी उद्योजकांनी दिला आहे. तसेच सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स या दोन्ही संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांसह, खासदार, आमदार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे, अशी माहिती मिरज असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक हेमंत महाबळ, माधव कुलकर्णी आणि कृष्णा व्हॅली चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील, अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष रमेश आरवाडे व पांडुरंग रूपनर यांनी दिली आहे.
याबरोबरच याप्रकरणी वसंतदादा औद्योगिक वसाहत, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत आणि लघु उद्योग भारती या संघटनांनी तीव्र आंदोलनाची तयारी दर्शविली आहे.
या जिल्ह्यात सोलापूरपेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच भविष्यात होणाºया महामार्गामुळे उद्योगक्षेत्र वाढेल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे कार्यालय स्थलांतरित करू नये; तसेच कोल्हापूरलाही हे कार्यालय जोडू नये, अशी उद्योग संघटनांची मागणी आहे. याचे तीव्र पडसाद जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीवरही पडणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
‘लोकमत’चे अभिनंदन...
सांगलीतील एमआयडीसीचे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू देणार नाही. हा निर्णय झाल्यास प्रगतीपथावर असलेला जिल्हा बॅकफूटवर जाणार आहेत. उद्योग विकास आघाडी याप्रश्नी रस्त्यावर उतरणार आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी आघाडी जिवाचे रान करेल. प्रथम एमआयडीसीच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहोत. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत, असे उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले यांनी सांगितले. अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल चौगुले यांच्यासह सर्वच उद्योजकांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.