पाणी योजना पूर्ण होऊनही पालिका घेते एमआयडीसीचे पाणी

By admin | Published: January 7, 2015 11:15 PM2015-01-07T23:15:40+5:302015-01-07T23:23:43+5:30

योजनेची कामे अपूर्ण : मळे भागातील नागरिकांना कूपनलिकांचाच आधार; अशुद्ध पाण्याचाही प्रश्न गंभीर

MIDC water takes water without fulfilling plan of water | पाणी योजना पूर्ण होऊनही पालिका घेते एमआयडीसीचे पाणी

पाणी योजना पूर्ण होऊनही पालिका घेते एमआयडीसीचे पाणी

Next

महालिंग सलगर - कुपवाडसह उपनगरांना भेडसावणारी पाणीटंचाई शहरात पाणी योजना झाल्यावर बऱ्यापैकी कमी झाली. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट थांबली. परंतु, रखडलेल्या जलशुध्दीकरण केंद्राअभावी अजूनही म्हणावे तसे शुध्द आणि मुबलक पाणी मिळत नाही. काही भागात कूपनलिकांवर, तर काही भागात एमआयडीसीच्या महागड्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ असेच चित्र आहे.
महापालिकेत समावेश झाल्यावर कुपवाडसह उपनगरांना सांगली, मिरज शहरांप्रमाणे मुबलक पाण्याचा पुरवठा होईल, अशी आशा होती. त्याबाबत लोकप्रतिनिधी आणि शासनानेही विकासाचे गाजर दाखविले होते. योजनाही तयार करण्यात आली. परंतु, कुपवाडवासीयांची तहान महापालिकेच्या स्थापनेनंतर दहा वर्षांनी भागली. कुपवाडसह उपनगरांसाठीची पाणी योजना झाल्यावर नागरिकांना कृष्णेचे मुबलक पाणी मिळू लागले. परंतु,वारणेच्या पाण्याविषयी लोकप्रतिनिधींनी कुपवाडवासीयांना दाखविलेले स्वप्न अधुरेच राहिले. वारणेच्या पाण्याविषयीची घोषणा हवेत विरली. परंतु, महाआघाडीने निवडणुकीत केलेल्या घोषणेप्रमाणे शहरात बऱ्याच भागात पाणी पोहोचवून, दिलेला शब्द पाळला. त्यामुळे टंचाई बऱ्यापैकी संपली. काही भागात मात्र अजूनही योजनेचे पाणी मिळत नाही.
आलिशान कॉलनी, कोंडका मळा, गणे मळा, आनंदनगर, विवेकानंद कॉलनी आदी भागासह काही उंचावर असलेल्या उपनगरांत अजूनही योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. आनंदनगर, विवेकानंद कॉलनी परिसरासह प्रभाग चोवीसच्या काही भागात अजूनही एमआयडीसीकडून महागड्या दराने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये वाया जातात. आलिशान कॉलनीसह मळे भागाला कूपनलिकांवरच तहान भागवावी लागत आहे.
या पाणी योजनेंतर्गत करण्यात येणारे जलशुध्दीकरण केंद्राचे कामही ठप्प आहे. त्याची गती निधी मिळाला नसल्यामुळे मंदावली आहे. या केंद्राचे काम पूर्ण झाल्यावर शहराला पूर्ण दाबाने एकाच सत्रात पाणीपुरवठा करणे सोपे जाईल, असे प्रशासन म्हणते, तर कामांची गती मंदावत ठेवून ठेकेदार दर वाढवून घेत आहेत. त्यामुळेच नागरिकांना एमआयडीसीकडून पाणी घ्यावे लागत आहे. प्रशासनाने जलशुध्दीकरण केंद्र व योजनेची कामे त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरवासीयांनी दिला आहे.


योजनेची कामे गतीने करू -गिरीबुवा
नागरिकांना २०४० पर्यंत पाणीपुरवठा होईल, त्यादृष्टीने पाणी योजनेची कामे केली आहेत. ८० कोटींची योजना उशिरा सुरू झाल्यामुळे गतीने होऊ शकली नाही, हे खरे आहे. जवळजवळ सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. आठ टाक्या व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. निधीची अडचण आहे. जलशुध्दीकरण केंद्राचे काम व उर्वरित काही कामांना येत्या पंधरा दिवसांत १६ कोटींचा फरक मिळाल्यावर गती देऊ, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता जे. व्ही. गिरी यांनी दिली.


शहरातील गावभागात अजूनही बऱ्याच ठिकाणी जुन्याच वाहिन्या टाकल्या आहेत. टाक्या पूर्ण झाल्या असल्या, तरीही काही कामे अपूर्ण आहेत. वाहिन्यांचे नकाशेही व्यवस्थित नाहीत. महाआघाडीच्या कालावधित सर्व गोंधळ झाला आहे. कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. परंतु, काही उपनगरे व मळे भाग अजूनही पाण्यापासून वंचितच राहिला आहे. हा गोंधळ संपवून शहरवासीयांना मुबलक व शुध्द पाणी देण्यासाठी यापुढील कालावधित प्रयत्न करणार आहोत.
- गजानन मगदूम, नगरसेवक

Web Title: MIDC water takes water without fulfilling plan of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.