सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच झाले बंद, प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:21 PM2023-01-27T15:21:33+5:302023-01-27T15:22:22+5:30
डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी
सांगली : शासनाकडून पुरेसा तांदूळ मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची हेळसांड चालू आहे. सध्या तांदूळच नसल्यामुळे ५० टक्के शाळांमधील मध्यान्ह भोजनच बंद झाल्यामुळे गरीब कुटुंबातील मुलांची उपासमार सुरू झाली आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार आहे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.
डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार ७३०.३५ टन तांदळाची गरज होती. तशी मागणीही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाकडे केली होती. यापैकी शासनाने एक हजार ६१.१८२ टन तांदूळ मंजूर केला. प्रत्यक्षात ६६१ टनच तांदूळ जिल्ह्याला मिळाला असून, ४०० टन तांदूळ मिळालाच नाही. डिसेंबर, जानेवारी महिन्यासाठी मंजूर तांदळापैकी ६६९ टन तांदूळ मिळावा, अशी शासनाकडे मागणी केली होती.
यापैकी बुधवार, दि. २५ रोजी २४० टन तांदूळ मिळाला आहे. पोषण आहारासाठी तांदूळच मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजनच बंद आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडील लेखाधिकारी यांच्याकडे विचारले असता, शासनाकडूनच तांदूळ मिळत नसल्यामुळे पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.
फेब्रुवारी, मार्चसाठी १७३० टन तांदूळ हवा
जिल्ह्यातील एक लाख ७० हजार १८५ विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी फेब्रुवारी, मार्च २०२३ या दोन महिन्यांसाठी एक हजार ७३० टन तांदळाची शिक्षण विभागाने शासनाकडे मागणी केली आहे. परंतु, शासनाने डिसेंबर, जानेवारी महिन्याचेच पूर्ण तांदूळ दिला नाही. यामुळे फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांचा तांदूळ तरी वेळेत मिळणार का?, असा जि. प. प्रशासनाला प्रश्न पडला आहे.
महापालिका क्षेत्रात २० दिवसांपासून बंद
महापालिका क्षेत्रातील शाळांना गेल्या २० दिवसांपासून तांदूळ मिळालेला नाही. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानातील शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन गेल्या २० दिवसांपासून मिळत नाही. याबाबत सध्या पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पालकांच्या तक्रारीने शिक्षक हैराण झाले आहेत.
जिल्ह्याची अशी आहे परिस्थिती
- मध्यान्ह भोजनाचे विद्यार्थी : १७०१८५
- दोन महिन्यांसाठी लागणारा तांदूळ : १७३० टन
- शासनाकडून मंजूर : १०६१.१६२
- प्रत्यक्षात मिळाला : ९०१