स्थलांतरित परदेशी पाहुुणे ठरताहेत शिकारीचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:27+5:302021-01-08T05:24:27+5:30
मिरजेत पक्षीप्रेमींनी ताब्यात घेतलेले हळदी-कुंकू बदक. त्याची तपासणी करून त्याला पाण्यात मुक्त करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...
मिरजेत पक्षीप्रेमींनी ताब्यात घेतलेले हळदी-कुंकू बदक. त्याची तपासणी करून त्याला पाण्यात मुक्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : हिवाळ्यात स्थलांतर करून आलेले परदेशी पक्षी शिकाऱ्यांचे बळी ठरत आहेत. गेल्या पंधरा दिवसात पक्ष्यांच्या अवैध शिकारीच्या चार घटना उघडकीस आल्या. रविवारी पक्षीप्रेमींनी कतलीसाठी आणलेले एक बदक ताब्यात घेऊन, त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
यंदा मुबलक पावसामुळे जिल्हाभरातील नदी-नाले व तलावात भरपूर पाणीसाठा झाला आहे. एरवी फक्त कृष्णा नदीतच पाणी असल्याने पक्ष्यांचा मुक्कामही नदी परिसरातच असायचा. पक्षीप्रेमींचे त्यांच्यावर लक्ष असल्याने शिकाऱ्यावर नियंत्रण राहायचे. यंदा जिल्हाभरात पाणीसाठ्यांवर पक्षी विखुरले आहेत. विशेषत: आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांत मोठ्या संख्येने पाणीसाठे झाले आहेत. तेथे आलेल्या देशी-विदेशी पक्ष्यांची सरसकट शिकार सुरू आहे. ग्रामीण भागात वन विभाग किंवा पक्षीप्रेमींचे लक्ष नसल्याचा फायदा शिकारी उठवत आहेत.
चौकट
अशी होते शिकार...
नदी-तलावाच्या काठावर जाळी लावून पक्ष्यांना पकडले जाते. प्रसंगी झाडांभोवतीही जाळी लावली जातात. काही शिकारी मासेमारीच्या जाळ्यानेही पाण्यात पोहणाऱ्या पक्ष्यांना पकडतात. मांसासाठी किंवा विक्रीसाठी शिकार केली जाते. चक्रवाक, हळदी-कुंकू बगळे यांची सर्रास शिकार होत असल्याचे आढळले आहे.
चौकट
मिरजेत बदकाची मुक्तता
रविवारी दुपारी वड्डी (ता. मिरज ) परिसरातील ओढ्यातून एका हळदी-कुंकू बदकाला पकडले होते. मिरजेतील एका चिकन विक्रेत्याकडे विक्रीसाठी त्याला शिकारी घेऊन आला होता. विक्रेत्याने याची माहिती पक्षीप्रेमींना दिल्यानंतर, त्या बदकाला त्यांनी ताब्यात घेतले व एका नाल्यातील पाण्यात पुन्हा मुक्त केले. शिकाऱ्याला ताकीद देऊन सोडले.
-----------