जिल्ह्यात १ लाख व्यक्तींचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:23 AM2021-07-25T04:23:12+5:302021-07-25T04:23:12+5:30
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ...
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत २२ हजार ४६७ कुटुंबातील १ लाख ५ हजार ६८३ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठ्या २४ हजार १ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चाैधरी यांनी सांगितले की, स्थलांतरित व्यक्तींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १,२३७ कुटुंबामधील ५ हजार १६० व्यक्ती, मिरज ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील ४ हजार २७२ कुटुंबातील १७ हजार ३८५ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले.
वाळवा तालुक्यात ७ हजार ९१८ कुटुंबातील ३९ हजार ५९० व्यक्तींचे तर अपर आष्टामधील ७९३ कुटुंबातील ३ हजार ६३४ व्यक्तींचे, शिराळा तालुक्यातील १०८५ कुटुंबातील ४ हजार ६८६ व्यक्तींचे, पलूस तालुक्यात ६ हजार ८५५ कुटुंबातील ३३ हजार २१ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. कुटुंबासह २४ हजार जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.