कोकणेवाडीतील २४६ नागरिकांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:35+5:302021-07-31T04:27:35+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी कोकणेवाडी ही वस्ती माळीणसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली वावरत असून येथील ४६ ...
शिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी कोकणेवाडी ही वस्ती माळीणसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली वावरत असून येथील ४६ कुटुंबांतील २४६ नागरिकांचे शुक्रवारी स्थलांतर करण्यात आले. याअगोदरच भाष्टेवाडीच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही वाड्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर होणे आवश्यक आहे.
तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी या ठिकाणी जाऊन सकाळपासून गुढे येथील कमला-माधव हायस्कूलमध्ये २४६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांची जेवणासह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
येथील वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून डोंगर खचू लागले आहेत. याची भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून कोकणेवाडी येथील डोंगर केव्हाही ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. कोकणेवाडी डोंगर लाल मातीने भरला आहे, दगडाची झीज झाली आहे. मुरूम मातीची धूप झाली आहे. हा थर जवळपास १० ते २० फूट खोल आहे. हा थर कठीण दगडापासून सुटलेला आहे. ओढ्यामुळे या डोंगराची झीज वेगाने होत आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की, हा डोंगराचा भाग केव्हाही सुटू शकतो. हा भाग सुटल्यास डोंगर पायथ्याशी असलेल्या चार घरांना व शाळेस मोठा धोका आहे, असा निष्कर्ष भूवैज्ञानिकांनी काढला होता.