दुष्काळी पट्ट्यातून ४५००० मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:24 PM2019-05-17T14:24:42+5:302019-05-17T14:28:58+5:30
दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.
अशोक डोंबाळे
सांगली : दरवर्षी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या सव्वालाख मजुरांपैकी सुमारे ४५ हजार मजूर दुष्काळामुळे यावर्षी गावाकडे परतलेच नाहीत. हे मजूर सध्या नदीकाठावरील वीटभट्ट्या, बाजारपेठेत हमाली आणि शेतमजुरीची कामे करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र जनावरे जगविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. काही तरुणांनी रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे गाठले आहे.
जिल्ह्यात मोठे पाच आणि छोटे ७९ असे ८४ पाझर तलाव आहेत. त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असून, सध्या १५११.७० दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मेअखेर शिल्लक पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
जिल्ह्यातील ४५० गावांवर दुष्काळाचे सावट असून, १८७ गावे आणि १०८८ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई आहे. या गावांतील सुमारे चार लाखांहून अधिक लोकसंख्येला १८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जत, आटपाडी या तालुक्यांतील पूर्व भागामध्ये पाणी टंचाई भीषण असून, येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वच ठिकाणी दोन ते तीन दिवसांतून एकदा टँकर येत आहे.
काही गावांत टँकरच्या पाण्यामध्ये गैरकारभार होत असल्याच्या तक्रारी आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर आणि मिरज पूर्व, कडेगाव तालुक्यातील ४५० गावांमधील शेतकऱ्यांच्या पदरात सलग दोन खरीप आणि रब्बी हंगाम पडले नाहीत. पेरणीनंतर कोवळी पिकेच वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मजुरीला जाण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी दुष्काळी तालुक्यांतून सव्वालाख मजूर मिरज, वाळवा, पलूस तालुक्यांसह कोल्हापूर, सातारा जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागामध्ये ऊस तोडणीसाठी जातात. यावर्षी गावाकडील दुष्काळाचे भीषण वास्तव पाहून जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोडीसाठी गेलेल्या मजुरांपैकी ४५ ते ५० हजार मजूर पुन्हा गावाकडे फिरकलेच नाहीत.
जत तालुक्यातून सर्वाधिक ५० ते ६० हजार मजुरांचे स्थलांतर होते. यापैकी ५० टक्के मजूर गावाकडे न जाता नदीकाठावर वीटभट्टी, शेतीच्या मजुरीसाठी मिरज, वाळवा, पलूस तालुक्यात थांबले असल्याचे ऊस तोडणी मुकादम दाजी माने यांनी सांगितले.
जत तालुक्यातील पांढरेवाडी, मोटेवाडी, कुलाळवाडी, आसंगी तुर्क, लकडेवाडी, कागनरी, लमाणतांडा (दरीबडची), लमाणतांडा (उटगी), निगडी बुद्रुक, करेवाडी (तिकोंडी), कारंडेवाडी, टोणेवाडी, मायथळ, पांडोझरी पारधी वस्ती ही गावे ओस पडली आहेत.
गावात फक्त वयोवृद्धच वास्तव्यास असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. आटपाडी तालुक्यातील करगणी, गोमेवाडी, दिघंची, लिंगीवरे, खरसुंडी, बनपुरी परिसरातील काही तरुणांनी पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर शहराकडे रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे.