सांगलीत शेअर मार्केटव्दारे लाखोंचा गंडा घालणारा मिलिंद गावडे तिसऱ्यांदा अटकेत
By शरद जाधव | Published: September 24, 2023 09:14 PM2023-09-24T21:14:27+5:302023-09-24T21:14:55+5:30
विश्रामबाग पोलिसांची कारवाई; कमी कालावधीत ‘दामदुप्पट’च्या आमिषाने फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शेअरमार्केट आणि फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या एस. एम. ग्लोबल कंपनीचा प्रमुख मिलिंद बाळासाहेब गाडवे (रा. सांगलीवाडी) याला विश्रामबाग पोलिसांनी तिसऱ्यांदा अटक केली. ग्लोबल कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत करून नऊ लाख ३४ हजार रुपयांना गंडा घातला होता. या प्रकारणी सुशीलकुमार गोरवाडे यांनी फिर्याद दिल्यानंतर मिलींद गाडवे याला जेरबंद करण्यात आले.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या मिलिंद गाडवे याच्यासह संचालकांवर यापूर्वीही सांगलीत गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. आता पुन्हा फिर्याद दाखल झाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी गाडवे याला तिसऱ्यांदा अटक केली. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून गाडवे प्रमुख असलेल्या एस. एम. ग्लोबल कंपनीने लाखो रुपयांचा गंडा घातला होता. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातीलही अनेक गुंतवणूकदारांचा यात समावेश होता. सुशीलकुमार गोरवाडे (रा. बालाजीनगर, सांगली) यांनाही गाडवे याने एस. एम. ग्लोबल कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षभरात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले.
गोरवाडे यांनी ९ ऑगस्ट २०२१ ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत रोख आणि काही रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर असे एकूण नऊ लाख ३४ हजार रुपये जमा केले होते. कंपनीत गुंतवणूक करून वर्ष उलटून गेले तरी दुपट परतावा मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. यापूर्वीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गाडवे याला विश्रामबाग पोलिसांनी न्यायालयातून ताब्यात घेत अटक केली.