दूध उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा, दर कमी मिळत असल्याने आर्थिक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 04:21 PM2019-04-26T16:21:01+5:302019-04-26T16:22:52+5:30
राज्य सरकारने जरी दूध खरेदी अनुदान पुन्हा जाहीर केले असली तरी, खरेदी दरात मात्र सरासरी दोन रुपयांची घटच येत आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असताना, दरदेखील कमी मिळत असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
अतुल जाधव
देवराष्ट्रे : राज्य सरकारने जरी दूध खरेदी अनुदान पुन्हा जाहीर केले असली तरी, खरेदी दरात मात्र सरासरी दोन रुपयांची घटच येत आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असताना, दरदेखील कमी मिळत असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
जून २०१८ मध्ये राज्य सरकारने दूध खरेदी दरात पाच रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केले होते. मार्च २०१९ मध्ये त्याची मुदत संपणार होती. शासनाने दूध अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेनुसार १ फेब्रुवारीपासून प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आहे.
या निर्णयानंतर दूध उत्पादकांना सरकारने प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा आदेश काढला आहे. याचदरम्यान, अनुदान बंद झाल्यामुळे संघांनी संस्थांना गाय दुधाचे दर पाच रुपये कमी करुन दूध बिलाचे वाटप केले होते.
आताच्या हंगामात उत्पादकाला प्रतिलिटर दुधासाठी २२ रुपयांचा खरेदी दर मिळत आहे. मात्र राहिलेले तीन रुपये दूध संघांना शासनाने अनुदानाची रक्कम (प्रतिलिटर ३ रुपये) दिल्यावर संघांकडून फरक स्वरूपात मिळू शकतील, असे सांगितले.