सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादन दोन लाख लिटरने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:34 PM2024-11-27T17:34:17+5:302024-11-27T17:34:31+5:30

चारा उपलब्धतेमुळे दररोज १५ लाख लीटर दूध संकलन

Milk production in Sangli district increased by two lakh litres | सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादन दोन लाख लिटरने वाढले

सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादन दोन लाख लिटरने वाढले

सदानंद औंधे

मिरज : चांगला पाऊस व चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दोन लाखाने वाढले आहे. वर्षभरात दैनंदिन सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने दुधासाठी पुष्ठकाळ मानले जातात. यावर्षी पुष्ठकाळात जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढले आहे.

सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे १५ लाख लीटर दूध संकलन होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यात इतर शहरात निर्यात व दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीसाठी वापर होते. पावसाळ्यानंतर चार महिन्यांच्या काळात सर्वत्र हिरवा चारा उपलब्ध असल्याने दूध उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. यावेळीही पुष्ठकाळात उत्पादन वाढल्याने दूध उत्पादन दैनंदिन १७ लाख लीटर वर पोहोचले असल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभाग कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

यावर्षी जिल्ह्यात जून महिन्यात दैनंदिन १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दूध उत्पादन १७ लाख लीटरपर्यंत गेले आहे. पुरेशा पावसाने चारा उपलब्ध असल्याचा हा परिणाम आहे. जिल्ह्यात चितळे, थोटे आदी १२ खासगी दूध डेअऱ्या, १७ मल्टीस्टेट दूध संघ दूध संकलन करतात. खासगी डेअऱ्यांचे दररोज १२ लाख लीटर दूध संकलन असून त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे दररोज ८ लाख लीटर संकलन आहे. पावडर निर्मितीसाठी येणारे मराठवाड्यातील अतिरिक्त दूध बंद झाल्याने ३ लाख लीटर दुधावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेची मिरज शासकीय दूध डेअरी मात्र बंद पडली आहे.

अनुदान योजना केली बंद

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लीटर ५ व सात रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ४० हजार दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर अनुदान पाठविण्यात येत होते. जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यासाठी दूध उत्पादकांसाठी अनुदान योजना होती. योजना नोव्हेंबरपासून बंद करण्यात आल्याने खासगी व सहकारी दूध संघांनी दूध दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादन

  • ऑगस्ट -१६ लाख २४ हजार २९८ लीटर
  • सप्टेंबर- १६ लाख ९० हजार ९७७ लीटर
  • ऑक्टोबर -१७ लाख १६ हजार ०८५ लीटर

Web Title: Milk production in Sangli district increased by two lakh litres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.