Milk Supply : आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही सांगली जिल्ह्यातील दूधसंकलन बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:05 PM2018-07-18T13:05:19+5:302018-07-18T13:27:43+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूधदरवाढीचे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होते. सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोरुन दूध संकलनासाठी आणलेले दूधही रस्त्यावर ओतून देत दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज दिली आहे.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूधदरवाढीचे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होते. सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोरुन दूध संकलनासाठी आणलेले दूधही रस्त्यावर ओतून देत दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आणखीन व्यापक केले आहे.
सांगली जिल्ह्यातील सोनहिरा परिसरात दुध संकलन केंद्रावर दूध संकलन होत असल्याचे वृत्त समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेत हे केंद्र बंद पाडले, तसेच संकलनासाठी आणलेले दूध रस्त्यावर ओतून दिले. यामुळे सोनहिरा परिसरात बुधवारी ४० हजार लिटर संकलन ठप्प झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील दूधउत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सोमवारी सुरु झालेल्या या दूध आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे, तरीही सोनहिरा परिसरातील ४० हजार लिटर दुध संकलन बंद ठेऊन सरकारचा निषेध करण्यात आला. कवठेमहांकाळ येथे जुन्या स्टँडवर सकाळी ८ वाजता खा. संजयकाका पाटील यांच्या कृष्णा दूध संघ आणि शेजाळ अॅग्रोमधून दूध संकलन आणि वितरण आंदोलकांनी बंद पाडले. पंचवीस कॅन दूध रस्त्यावर ओतले. माळवाडी (ता. पलूस) येथील सांगली-माळवाडी मुक्कामी दोन बसेसच्या आंदोलकांनी काचा फोडल्या आहेत.
जिल्ह्यात दोन दिवस स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते. मंगळवारी रात्री दूध संघ आणि खासगी डेअरी चालकांनी छुप्या पध्दतीने दूध संकलन आणि वितरण सुरु केले होते. यामुळे आंदोलकांनी दूध संघ आणि डेअरी चालकांच्या विरोधातील आंदोलनाची धार तीव्र केली आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या कृष्णा दूध संघाकडून कवठेमहांकाळ तालुक्यातील दूध संकलन चालू होते. दूध संकलन करणारे वाहन ताब्यात घेवून तेथील पंचवीस कॅन दूध रस्त्यावर ओतून आंदोलकांनी राज्य शासनाचा त्यांनी निषेध केला. शेजाळ अॅग्रोच्या दूधाचेही संकलन थांबवून त्यांच्याकडील दूधही रस्त्यावर ओतले. एका दूध उत्पादक शेतकºयास दुधाचा अभिषेक घालण्यात आला. शासनाचा निषेध नोंदवत हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले. कवठेमहांकाळ येथील दोन दूध संकलन केंद्राची मोडतोड करून तेथील संकलन बंद पाडले. स्वाभिमातनी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली आहे. दूध उत्पादक शेतकरीही मोठ्या उत्साहाने आंदोलनात सहभागी होत आहेत.
माळवाडी (ता. पलूस) येथील सांगली-माळवाडी या दोन बसेस मंगळवारी रात्री १० वाजता मुक्कामी गेल्या होत्या. या बसेसवर बुधवारी पहाटे दगडफेक करुन काचा फोडल्या आहेत. यात दोन्ही बसेसचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगारातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी शहरातील आणखीन दोन ठिकाणचे दूध संकलन केंद्रे फोडली. जुन्या बस स्थनाकावर हजारो लिटर दुध ओतून दिले. तसेच चोरून दूध संकलन करणाऱ्या आणि दूध वाहतूक करणारी वाहने अडवून कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतून देण्यास भाग पाडले.