अंकलखोपमध्ये वादळी वाऱ्याने पिकांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:38+5:302021-04-29T04:19:38+5:30
फोटो ओळ : अंकलखोप (ता. पलुस) येथील शेतकरी शक्तीकुमार पाटील यांच्या शेतातील पपईची झाडे वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली. अंकलखोप ...
फोटो ओळ : अंकलखोप (ता. पलुस) येथील शेतकरी शक्तीकुमार पाटील यांच्या शेतातील पपईची झाडे वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली.
अंकलखोप : अंकलखोप (ता. पलुस) परिसरात कृष्णाकाठावर गेले दोन दिवस झालेल्या वादळी वारे व गारांच्या पावसाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना काळात शेतकरी अडचणीत असतानाच हा फटका बसला आहे.
परिसरातील केळीच्या बागांवर गारा पडल्याने केळी पिकाचे नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री संपूर्ण कृष्णाकाठावर वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेली जनता या पावसाने सुखावली आहे. मात्र पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांचे नुकसान केले.
अंकलखोप येथील शेतकरी शक्तीकुमार पाटील यांच्या पपईचे साधरण ४ ते ५ लाखांचे, शिवाजी भोई यांच्या ढबु पिकाचे ३ ते ३.५ लाखांचे, उमेश चौगुले यांच्या मिरचीचे २ लाखांचे, शीतल बिरनाळे यांचे केळी व ढबु पिकाचे ५ लाखांचे नुकसान झाले. याशिवाय धैर्यशील पाटील यांचे एक लाखावर नुकसान झाले. अंकलखोप येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे १४ ते १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच शक्तीकुमार पाटील यांची पपईची बाग वाऱ्याने भुईसपाट झाली आहे.