तासगावमध्ये बक्षीस योजनेतून लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:42 PM2018-08-27T23:42:41+5:302018-08-27T23:42:50+5:30
तासगाव : अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्रायजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
सोमवारी शेवटचा ड्रॉ असल्याने अनेक ग्राहक तासगावात आले होते. मात्र हा ड्रॉ काढण्यापूर्वीच कंपनीचे चालक पसार झाल्याचे लक्षात आले. लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याने संबंधित ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची चर्चादेखील आहे. तासगाव येथे काही महिन्यांपासून सरस्वतीनगरमध्ये आॅफिस थाटून ही कंपनी सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे चालक आणि कंपनीसाठी काम करणारे एजंट बहुतांश परजिल्ह्यांतीलच होते.
या कंपनीच्या माध्यमातून एजंटांनी ग्रामीण भाग पिंजून काढला होता. शंभर रुपयांत सभासद करून पुढील काही महिने ठराविक दिवसांनी लकी ड्रॉ काढायचा. त्यामध्ये नाव आलेल्या सभासदाला चारचाकी, दुचाकी वाहन, ट्रॅक्टरसह हजारो रुपयांच्या अनेक महागड्या वस्तू, सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. पहिल्या पाच सोडतींसाठी ४९९ रुपये, तर नंतरच्या सहा सोडतींसाठी ८९९ रुपयांचा हप्ता भरायचा होता. इतक्या कमी रकमेत अनेक महागड्या वस्तू स्वस्तात मिळणार, या आमिषाने अनेक लोक बळी पडले.
या कंपनीच्या पहिल्या लकी ड्रॉची सोडत २ एप्रिल २०१८ ला झाली होती, तर शेवटची सोडत २७ आॅगस्टला होणार होती. त्यानुसार सोमवारी या योजनेत सभासद झालेले अनेक ग्राहक तासगाव येथे आले. कंपनीच्या संचालकांनी सांगितल्यानुसार शहरातीलच एका कार्यालयात उपस्थित राहिले; मात्र या ठिकाणी कपंनीचा कोणताच प्रतिनिधी दिसला नाही. त्यामुळे आलेल्या ग्राहकांनी सरस्वतीनगर येथे कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र या ठिकाणी कार्यालय गुंडाळून कंपनीच्या सर्वच प्रतिनिधींनी पोबारा केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तालुक्यातील अनेक गावातील ७८ लोकांनी लेखी तक्रार दिली आहे. मात्र घोटाळ्याची व्याप्ती यापेक्षा मोठी असून, याहीपेक्षा अनेक लोकांना गंडा बसला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ग्राहकाला आठ हजार रुपयांना चुना
स्वस्तात मस्त वस्तू घेण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या ग्राहकांत सामान्य लोकांचांच जास्त भरणा आहे. ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचून लोकांना भुरळ पाडून गेल्या सहा महिन्यांपासून महिन्याला ठराविक रकमेचे हप्ते गोळा करण्याचे काम राजरोसपणे सुरू होते. कंपनीच्या नियमानुसार आठही सोडतीत मोठे बक्षीस लागले नाही, तरीदेखील बक्षीस न लागलेल्या ग्राहकांना फ्रीजचे हमखास वाटप होणार होते. त्यामुळे अनेक ग्राहक सहज गळाला लागले. सुमारे आठ हजार रुपये प्रत्येक ग्राहकाकडून कंपनीकडे भरण्यात आले होते. आता कंपनीच्या प्रतिनिधींनी पोबारा केल्याने प्रत्येक ग्राहकाला आठ हजार रुपयांचा चुना लागला आहे.