आष्ट्यात दोन संस्थांकडून लाखोंचा गंडा
By admin | Published: December 8, 2014 11:50 PM2014-12-08T23:50:51+5:302014-12-09T00:25:31+5:30
गुन्हा दाखल : दुकान नोंदणी व नूतनीकरणाच्या नावाखाली फाडल्या बोगस पावत्या
आष्टा : आष्टा शहरात दुकाने नोंदणी व नूतनीकरणाकरिता माऊली फाऊंडेशन, इस्लामपूर व शिवाजी पवार दादा शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेकडून बोगस पावत्यांद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संस्थेच्या पावतीपुस्तकावर शासनाच्या राजमुद्रेचा वापर करून खोट्या पावत्यांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध आष्टा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्राहक संघटनेचे आष्टा शहर अध्यक्ष प्रा. चंद्रकांत लांडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
शहरातील अनेक दुकानदार, व्यावसायिक डिसेंबर महिना असल्याने दुकानाची नोंदणी व नूतनीकरण करण्याच्या चिंतेत होते. आष्टा शहरातील दुकाने नोंदणीचे कार्यालय बंद आहे. याचवेळी इस्लामपूर येथील माऊली फाऊंडेशनच्यावतीने सरकारी नोकर असल्याचे भासवून दुकाने व नोंदणी व नूतनीकरणकरिता शहरातील दुकानदारांकडून फी वसूल करण्यात आली. आष्टा येथील ग्राहक संघटनेचे प्रा. चंद्रकांत लांडे, डॉ. सतीश बापट, वीर कुदळे व अनेक दुकानदारांना या बोगसगिरीची माहिती मिळाली. संस्थेच्या मुली शहरात फिरून ५0 रुपये घेऊन शॉप अॅक्ट लायसन्स देत असल्याचे त्यांना समजले. सर्वांनी चौकशी केली असता, ही संस्था बोगस असल्याचे शनिवारी लक्षात आल्यानंतर सांगलीचे सहायक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली, मात्र त्यांनी दखल घेतली नाही.
सोमवार, दि. ८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान पालिकेच्या आनंदराव देसावळे सभागृहात शॉप अॅक्ट लायसन्स नोंदणी व नूतनीकरणाकरिता कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये सात ते आठ लोक टेबल मांडून दुकानदारांकडून ५0, १0६0, १५६0 रुपये घेऊन पावत्या देत होते. त्यांना कायदेशीर अधिकार आहे का? अशी विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सर्वांनी पोलीस उपअधीक्षक आरती बनसोडे यांना बोलाविल्यानंतर फाऊंडेशनचे क्षीरसागर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त पाटणकर व दुकान निरीक्षक संजय पटले यांच्या तोंडी आदेशानेच कॅम्प आयोजित केल्याचे सांगितले. दरम्यान, पाटणकर घटनास्थळी आले व त्यांनी हा कॅम्प बेकायदेशीर असून, आमची कोणतीही परवानगी नसल्याचे सांगितले. तपास पोलीस उपअधीक्षक बनसोडे करीत आहेत. (वार्ताहर)
धनादेश वठला नाही
एका व्यापाऱ्याने महापालिकेला एलबीटीपोटी दिलेला ५0 हजार रुपयांचा धनादेश वठला नाही. त्यामुळे महापालिकेने संबंधित व्यापाऱ्याला सूचना देऊन कारवाई करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
पोलीस ठाण्यासमोर गर्दी...
आष्टा येथील देसावळे सभागृहात तसेच पोलीस ठाण्याला यात्रेचे स्वरुप आले होते. हजारो दुकानदार, युवक घटनास्थळी दाखल झाले होते.
सहा. कामगार आयुक्तांच्यावतीने त्यांची फिर्याद घेण्याबाबत पोलिसांवर दबाव वाढत होता. परंतु हजारो नागरिकांनी कामगार आयुक्त पाटणकर व दुकान निरीक्षक संजय पटले हेच दोषी असल्याचे सांगितल्याने अखेर प्रा. लांडे यांची फिर्याद घेण्यात आली. त्यांच्यावर कारवाईची मागणी करीत ७ आरोपींना अटक करण्यात आली.
संस्थेच्या पदाधिकारी, सदस्यांवर गुन्हा
आष्टा पोलिसात माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष शाम कुंडलिक क्षीरसागर (वय ४१, रा. इस्लामपूर), सदस्य संदीप शहाजी देसावळे (२६, रा. बहाद्दूरवाडी), संजय पांडुरंग गायकवाड (३८, रा. येलूर), अभिजित पांडुरंग मेढे (२०, रा. अभियंतानगर, इस्लामपूर), राहुल दादाराव डोरले (२७, रा. इस्लामपूर), विजय सर्जेराव मिसाळ (१९, रा. कामेरी), अलोक अशोक रांजवणे (२२, रा. गावराई विहिरीजवळ, कामेरी) यांच्यावर कलम ४२०, ४६५ अन्वये फसवणूक व डुप्लिकेट कागदपत्रे तयार केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.