औषध खरेदीत लाखोंचा घोटाळा

By admin | Published: May 30, 2016 11:39 PM2016-05-30T23:39:59+5:302016-05-31T00:28:12+5:30

नगरसेवकांचा आरोप : प्रभाग बैठकीत आरोग्य विभाग धारेवर

Millions of scams to buy drugs | औषध खरेदीत लाखोंचा घोटाळा

औषध खरेदीत लाखोंचा घोटाळा

Next

सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासप्रतिबंधक व इतर औषध खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमवारी प्रभाग समिती दोनच्या बैठकीत करण्यात आला. पाचशे रुपयाला पाच लिटरचे औषध दीड हजार रुपयांनी खरेदी केले जात असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. सभापती मृणाल पाटील यांनी औषध खरेदीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रभाग समिती क्रमांक दोनची बैठक सभापती मृणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तब्बल सात महिन्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. डास व इतर औषधांवर महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. बाजारात ही औषधे साडेचारशे ते साडेपाचशे रुपयांना येतात. महापालिकेकडून हीच औषधे दीड हजार रुपयांना खरेदी केली जात आहेत, असे नगरसेवक युवराज गायकवाड, राजू गवळी यांनी सांगितले. औषध खरेदीत लाखो रुपयांचा चुना लावला जात असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सभापती पाटील यांनी अखेर आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. सुलभ शौचालये, सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अ‍ॅसिड खरेदी केले जाते. पण गेल्या काही वर्षापासून पालिकेने अ‍ॅसिडच खरेदी केलेले नाही. त्यामुळे शौचालये निर्जंतुकीकरण न झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. प्रभाग समिती दोनच्या कार्यक्षेत्रात मोकाट कुत्री व डुकरांवर कारवाई केली जात नाही. अनेक हॉटेल व चिकन सेंटरकडे महापालिकेचा परवानाच नाही. बेकायदा सेंटरमधील वेस्टेज कचरा कुंडीत टाकला जात आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहेत. याप्रकरणी आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही करण्यात आला. प्रभाग समितीकडे नवीन २५ व दुरुस्त केलेले २२ अशी ४७ कंटेनर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. पण नगरसेवकांनी आरोग्य विभागाचा दावा फेटाळत प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अपुरे कंटेनर असल्याचे सांगितले. त्यावर सभापती पाटील यांनी नवीन व दुरुस्त केलेले ४७ कंटेनरची स्थळनिहाय यादी सादर करण्याचे आदेश दिले. प्रभागात १२५ कंटेनर आहेत. त्यापैकी ४५ कंटेनरमधीलच कचरा उचलला जातो. इतर कंटेनरमधील कचरा तसाच पडून असतो. गटारीतील गाळ भरण्यासाठी गाड्यांची कमतरता आहे. गाळ भरण्यासाठी घंटागाडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे घंटागाड्या खराब होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांच्या पगारावर डल्ला--नगरसेवक युवराज गायकवाड यांनी अमरधाम स्मशानभूमीत अपुरे कर्मचारी असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. स्मशानभूमीत कर्मचारी कमी असल्याने स्वच्छता होत नाही. नागरिकांनाही सेवा दिली जात नाही. पालिकेच्या रेकॉर्डवर दहा कर्मचाऱ्यांची स्मशानभूमीत नियुक्ती आहे. पण केवळ तीनच कर्मचारी कामावर असतात. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सात कर्मचाऱ्यांचा पगार लाटला जात असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.

Web Title: Millions of scams to buy drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.