पाण्यासाठी कोट्यवधी रूपये पाण्यात

By admin | Published: February 5, 2016 10:46 PM2016-02-05T22:46:57+5:302016-02-05T23:58:39+5:30

मिरज पूर्वमध्ये कूपनलिका यंत्राची घरघर : भूजल पातळीत मोठी घट

Millions of water for water in the water | पाण्यासाठी कोट्यवधी रूपये पाण्यात

पाण्यासाठी कोट्यवधी रूपये पाण्यात

Next

एरंडोली : म्हैसाळ योजनेचे आवर्तन अजून सुरू झालेले नाही. ते सुरू होते की नाही, याबाबतही अनिश्चिततेचे वातावरण आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. वाढलेल्या बागायत क्षेत्रास पाणी अपुरे पडू लागले आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून परिसरात कूपनलिका खुदाई करणाऱ्या वाहनांची घरघर सुरू असलेली दिसत आहे. परंतु भूजल पातळी घटल्याने मोठ्या अपेक्षेने कूपनलिका खोदणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.डिझेलचे दर कमी झाल्याने कूपनलिका खुदाईचा दर घटला आहे. ४८ रूपये प्रति फूट दर सुरू असून तीनशे फुटापासून पुढील प्रत्येक शंभर फुटानंतर प्रति फूट ५ रूपयांची वाढ होते. लाखोची गुंतवणूक करून उभ्या असणाऱ्या बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी कूपनलिका खुदाईचा मार्ग स्वीकारला आहे. सरासरी तीनशे ते पाचशे फूट खोल कूपनलिका खोदल्या आहेत. यातील बहुसंख्य कोरड्याच पडल्या आहेत. काहींना पाणी लागले, पण ते वाढत्या उन्हाबरोबर कमी होत आहे. पाण्याचा प्रश्न जैसे थेच आहे. म्हैसाळच्या पाण्याने बोअरवेलची घरघर थांबू शकते. यापुढील काळात शेतकरी बांधवांनी संघटित होऊ म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी भरल्यास बोअरवेलमधून पाणी बाहेर काढण्यासाठी लागणाऱ्या विजेसाठी व जितका खर्च होतो, त्याहीपेक्षा कमी खर्चात म्हैसाळचे पाणी आपल्या शेतात येऊ शकते. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघून बोअरवेलची घरघर कायमचीच थांबेल कूपनलिका खुदाईसाठीचा खर्च कूपनलिकेची खोली व केसिंगची लांबी यावर आधारित असून, तो सरासरी पंचवीस हजारापर्यंत होतो. एक कूपनलिका खुदाई यंत्र २४ तासात कमीत कमी चार कूपनलिकांची खुदाई करते. अशा कूपनलिका खुदाई करणाऱ्या १० ते १५ गाड्या मिरज पूर्व भागात गेले दोन महिने अहोरात्र चालू आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कूपनलिका खुदाईचे प्रमाण दुप्पट असून, हा व्यवसाय तेजीत असल्याचे कूपनलिका यंत्र व्यावसायिक सांगत आहेत. सर्वसाधारण दररोज सरासरी दहा लाखांचा चुराडा होत आहे. दोन महिन्यात कोट्यवधी रूपये खर्च झाले. या भागात कार्यरत जास्तीत जास्त कूपनलिका खुदाई गाड्या तामिळनाडू राज्यातील आहेत. प्रतिफूट कमिशनवर महाराष्ट्रातील एजंट या गाड्या चालवतात. गाड्यांवरील सर्व कामगारही तमीळच आहेत.

स्वयंघोषित पाणाड्यांकडून ‘लूट’
जमिनीतील पाणी दाखवणारे पाणाडे गल्ली-बोळात निर्माण होत आहेत. वेगवेगळ््या पध्दतीने ते पाणी दाखवतात. नारळ पाण्याचा तांब्या, तवा, तांब्याची तार यांचा वापर पाणी दाखवताना करून आपली कृती शास्त्रीय असल्याचा आभास करून शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचा उद्योग सुरू आहे, तर काहीजण घरात बसूनच शेतातील पाणी असणारी जागा सांगण्याचे ढोंग करत शेतकरी बांधवांच्या असहाय्यतेचा फायदा घेत आहेत. पाचशेपासून पुढे यांची दक्षिणा सुरू होते. सुशिक्षित पाणाड्यांची संख्याही लक्षणीय असून, काही प्राध्यापक, पोलीसही हा जोडव्यवसाय करत असल्याची जोरदार चर्चा परिसरात आहेत .


तर शेतकऱ्यांचेही सहकार्य..
म्हैसाळ योजनेच्या पाणीपट्टीसाठी पैसे नाहीत, पण बोअरवेल खुदाईसाठी आहेत. एकरी दोन हजार रुपये म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करणारे शेतकरी बोअरवेलसाठी २५ हजार खर्च करण्यासाठी पुढे येतात. प्रश्न पैशाचा नाही, तर म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाची अनिश्चतता व पाणी वाटपाच्या नियोजनाचा अभाव यामुळे पाणीपट्टी वसुली होत नाही, हे प्रशासन व राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन नियोजन केल्यास पाणीपट्टी भरण्यास शेतकरी पुढे येतील.

Web Title: Millions of water for water in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.