एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:26+5:302020-12-29T04:26:26+5:30
एमआयएम व शिवसेनेचे राज्यात फारसे सख्य नसले तरी, सांगलीत मात्र एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास शिवसेनेचे ...
एमआयएम व शिवसेनेचे राज्यात फारसे सख्य नसले तरी, सांगलीत मात्र एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह शिवसेनेचे सांगली-मिरजेतील पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी कांबळे यांना प्रवेशाची ऑफरही दिली. डॉ. महेशकुमार कांबळे यांनीही त्यास जाहीर दुजोरा दिला. यामुळे डॉ. महेशकुमार कांबळे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर एमआयएम पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कांबळे यांची निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी एमआयएमसह संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेची स्थापना करून सफाई कामगार व महापालिका कर्मचाऱ्यांचे संघटन केले. शिवसेना सत्तेत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या त्यांनी आमदार अनिल बाबर यांच्यासमोर मांडल्या. सफाई कर्मचाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे घरकुल आवास योजना, बदली कामगारांना कायम नोकरी, कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना आदी मागण्या त्यांनी केल्या.
मिरज राखीव विधानसभा मतदारसंघ असल्याने शिवसेनेलाही या मतदारसंघात उमेदवार हवा आहे. यामुळे बाबर आणि विभुते यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रवेशाची आफर दिली आहे. डॉ. कांबळे यांना पक्षात घेऊन मिरज मतदारसंघात भाजपला आव्हान देण्याचे शिवसेनेचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे.