कामगाराच्या प्रश्नांसाठी राजेवाडी कारखान्यासमोर ‘एमआयएम’ची निदर्शने
By संतोष भिसे | Published: December 21, 2023 05:06 PM2023-12-21T17:06:08+5:302023-12-21T17:06:19+5:30
दिघंची : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री सद्गुरू शुगर साखर कारखान्यातील कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांना व कुटुंबाला ...
दिघंची : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील श्री श्री सद्गुरू शुगर साखर कारखान्यातील कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांना व कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एमआयएमच्यावतीने बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक उद्धव जाधव यांनी कारखाना सभेत विषय ठेवून न्याय देण्याचे लेखी आश्वासन संघटनेकडून देण्यात आले.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, आटपाडी तालुकाध्यक्ष अमित वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले की, श्री श्री सद्गुरू शुगर कारखान्याच्या गॅस टाकीच्या पाइपला आग लागली होती. काम करत असताना आबा वाघमारे यांनी वीस फूट उंचीवरून उडी मारून आग विझवून कारखान्याची होणारी जीवितहानी रोखली. यात आबा वाघमारे यांच्या गुडघ्याला व पाठीच्या मणक्याला इजा झाल्याने शस्त्रक्रिया झाली आहे. वाघमारे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
याप्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष शेषगिरीराव यांच्याकडे दाद मागितली. पण, कर्मचाऱ्यांना मदत करण्याची त्यांची भावना नाही. म्हणून आबा वाघमारे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी किरण वाघमारे, सुभाष बनसोडे, सूरज पठाण, मोहसीन तांबोळी, सचिन बुधावले, बंडू सावंत, अर्जुन वाघमारे, वैभव वाघमारे, कुमार लोंढे, पोपट वाघमारे, पंचशीला वाघमारे आदी उपस्थित होते.