मिरज पूर्व भागात खनिजाची लूट
By admin | Published: March 7, 2016 12:12 AM2016-03-07T00:12:21+5:302016-03-07T00:13:44+5:30
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांचा आरोप
अण्णा खोत --मालगाव -: मिरज पूर्व भागातील सिध्देवाडी परिसरात महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गौण खनिजाची लूट सुरु आहे. परवान्यापेक्षा जादा उत्खनन करुन मुरुमाची वाहतूक करणारे एजंट गब्बर बनत असल्याचे चित्र आहे. मुरुमाच्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्ते दुभंगल्याने मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मुरूमाचे उत्खनन होत असल्याचे चित्र आहे.
शहरात घरबांधकामाच्या भरावासाठी मुरुमाची मोठी मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे मुरुम पुरवठादार एजंटांचे पीक आले आहे. मुरुम उत्खननासाठी सध्या सिध्देवाडी परिसर हा प्रमुख केंद्र बनला आहे. शहरातील बड्या एजंटांनी स्थानिक एजंटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पडजमिनींचा शोध घेऊन मुरुमाचे उत्खनन सुरु केले आहे. या उत्खननावर नियंत्रण असणाऱ्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एजंटांना अभय असल्याने, नावाला परवाना काढून दिवस-रात्र उत्खनन करुन लाखो रुपयांच्या मुरुमाची लूट सुरु आहे. स्थानिक महसूलच्या अधिकाऱ्यांकडून जेथे मुरुम उत्खनन सुरु आहे, त्या ठिकाणाची व परवान्याची तपासणीही केली जात नाही.
परिसरातील बेकायदा मुरुम उत्खननाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून एजंटांची पाठराखण केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याने गेल्या दोन वर्षात जुजबी कारवाईपलीकडे कोणतेच कठोर पाऊल उचललेले नसल्याने, मुरुमाचे अवैध उत्खनन करुन एजंटांनी पर्यावरणालाही आव्हान दिले आहे. एकूणच या साऱ्या प्रकारांची चौकशी करून अवैध गौणखनिजाचे उत्खनन रोखावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ओव्हरलोड वाहतूक : रस्ते दुभंगले
सिध्देवाडी परिसरात मुरुमाच्या ओव्हरलोड वाहतुकीचा फटका गावालगतच्या प्रमुख रस्त्यांना बसला आहे. दंडोबा रस्ता ते खण फाटा व सिध्देवाडी ते कळंबी फाटा या रस्त्यावरुन मुरुमाची वाहतूक सुरु आहे. वाहतुकीसाठी कमी क्षमतेच्या या रस्त्यावरुन सहाचाकीबरोबरच दहाचाकी वाहनांच्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी निरुपयोगी झाले आहेत. वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेल्या सिध्देवाडी ते खण फाटा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष असल्याने, रस्त्यांवर होणारा खर्चही वाया जात आहे.
उत्खनन परवान्यातही गोलमाल!
मुरुम उत्खननासाठी शेतकऱ्याची जमीन कराराने घेतली जाते. ज्या शेतजमिनीतील किती ब्रासचा मुरुम उत्खनन करावयाचा आहे, त्याचा महसुली कर भरुन (रॉयल्टी) परवाना घ्यावा लागतो. सध्या या परवान्यातही गोलमाल सुरु आहे. जुन्या परवान्याच्या नावाखाली दुसऱ्या गटातील जमिनीच्या मुरुमाचे उत्खनन करुन शासनाचा महसूल बुडविण्याचाही उद्योग सुरु असताना, महसूल विभागाचे त्याकडेही दुर्लक्ष असल्याने, एजंटांना कारवाईचे भय उरलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सुरु असलेल्या गौण खनिज उत्खननाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.