वेदांता कुणामुळे राज्याबाहेर गेला, हे आता कळेल; चंद्रकांत पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला
By शीतल पाटील | Published: September 23, 2022 07:30 PM2022-09-23T19:30:27+5:302022-09-23T19:31:12+5:30
मुंबईतील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबत पाटील यांनी भाष्य करण्याचे टाळले.
सांगली : माजी मंत्री आदित्य ठाकरे राज्यात जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. पण वेदांता प्रकल्प नेमका कुणामुळे राज्याबाहेर गेला, हे या मोर्चातून जनतेला कळेल. आदित्य ठाकरे स्वत:च्या पायावर स्वत: कुऱ्हाड मारून घेत आहे, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी सांगलीत लगावला.
मंत्री पाटील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर होते. यादरम्यान वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गट, भाजप व शिवसेनेत या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनआक्रोश आंदोलन जाहीर केले आहे. याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वेदांता प्रकल्प नेमका कोणामुळे राज्याबाहेर गेला हे आता कळेल. आंदोलनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे स्वत:च्या पायावर स्वत:च कुऱ्हाड मारून घेत आहेत.
दसरा मेळाव्याबाबत भाष्य टाळले
मुंबईतील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबत पाटील यांनी भाष्य करण्याचे टाळले. न्यायालयाच्या निकालावर बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.