'मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणूक काढणार'
By संतोष भिसे | Published: December 13, 2022 02:00 PM2022-12-13T14:00:48+5:302022-12-13T14:13:53+5:30
डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने घेतला निर्णय
सांगली : उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गडबडे व त्याचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचा निर्णय डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने घेतला आहे. सांगलीत २३ डिसेंबर रोजी जाहीर सत्कार करणार असल्याचे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी सांगितले.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा निषेध संघटनेतर्फे करण्यात आला. प्रा. कांबळे म्हणाले, पाटील यांनी अटकेची कारवाई करुन लोकशाहीलाच आव्हान दिले आहे. महापुरुषांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करुन मानसिकता स्पष्ट केली आहे. शाई फेकून त्याचा निषेध करणाऱ्या गडबडे यांचे अभिनंदन करणार आहोत.
२३ डिसेंबर रोजी सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होईल. अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सांगता होईल. शाईफेक करणारे गडबडे, विजय होवाळ, आकाश इजद व पत्रकार गोविंद वाकडे यांचा सत्कार केला जाईल.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीला कांबळे यांच्यासह नंदकुमार नांगरे, सतीश लोंढे, संदीप ठोंबरे, अशोक वायदंडे, दिलीप कुरणे, प्रशांत आवळे, कबीर चव्हाण, अर्जुन मजले, गॅब्रीएल तिवडे, शेखर मोहिते, वीरु फाळके, अमित कांबळे, भास्कर सदाकळे, सुनील होळकर, विक्रम मोहिते, बाळासाहेब काटे, शंभू बल्लाळ, मानसिंग बल्लाळ, संभाजी भोसले, अविनाश वाघमारे, विशाल कोल्हार, रवी लांडगे, अनिल सुहासे, शंकर आवळे आदी उपस्थित होते.