Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:13 PM2022-06-15T12:13:44+5:302022-06-15T13:07:28+5:30
प्रत्यक्ष जनतेतून ज्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सर्वांना माहीत आहेत
सांगली : प्रत्यक्ष जनतेतून ज्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सर्वांना माहीत आहेत. गेल्या काही वर्षात मैदानातला कल कोल्हापूरकरांनी दाखवून दिला आहे. त्यामुळे आम्ही जे काही ठरलंय ते रणांगणातच करू, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नूतन खासदार धनंजय महाडिक यांना अप्रत्यक्षपणे लगावला.
पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनकडून सांगली ब्रँडिंग अंतर्गत शहरातील झुलेलाल चौकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता नामफलकाचे उद्घाटन सतेज पाटील यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले की, आम्ही मैदानात कसे उतरतो ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे सवयीप्रमाणे आम्ही रणांगणातच काय करायचे ते करू. विधान परिषदेतील भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असला तरी तो खरा ठरणार नाही. आम्हाला ताजा अनुभव आहे. त्यामुळे ज्या त्रुटी राहिल्या त्या दुरुस्त करून आम्ही महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार निवडून आणू. यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांच्या चौकशीबाबत ते म्हणाले की, ज्या ईडीचे नाव पूर्वी पाच लोकांना माहीत होते, आता ती ईडी गल्ली-बोळातील लोकांनाही माहीत झाली आहे. इतका या यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाही अडचणीत आणण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. आमचे नेते यातून सहीसलामत बाहेर पडतील.
महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी
देहू येथील समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नसल्याबाबत पाटील म्हणाले, नेमके तेथे व्यासपीठावर काय घडले हे आपल्याला माहीत नाही. पण, जाणीवपूर्वक अजित पवारांना प्रोटोकॉलनुसार भाषण करण्यापासून अडवण्यात आले असेल तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे.
राज्यसभेचा निकाल आम्ही स्वीकारला
सतेज पाटील म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत जो निकाल लागला, तो आम्ही कोल्हापूरकर म्हणून स्वीकारला आहे. काही स्थित्यंतरे स्वीकारावी लागतात. खिलाडूवृत्तीने आम्ही ती स्वीकारली आहेत. पुढे काय करायचे ते पाहू.