कृषी राज्यमंत्री सदाभाऊंची आता ‘रयत क्रांती संघटना’, संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:51 AM2017-09-21T04:51:22+5:302017-09-21T04:51:24+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी उभा दावा घेतलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते आता ‘रयत क्रांती’ संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येणार आहेत. खोत आज गुरुवारी कोल्हापुरात याबाबत घोषणा करणार आहेत. यावेळी सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाचा घाटही घालण्यात आला आहे
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी उभा दावा घेतलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते आता ‘रयत क्रांती’ संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येणार आहेत. खोत आज गुरुवारी कोल्हापुरात याबाबत घोषणा करणार आहेत. यावेळी सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाचा घाटही घालण्यात आला आहे.
खोत यांना मंत्रिपद दिल्यापासून ते शेतकºयांचे प्रश्न आणि संघटनेच्या ध्येयधोरणांपासून दूर गेल्याचा आरोप खा. शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागला. त्यातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खोत यांनी स्वत:च्या मुलाला उमेदवारी दिल्याने दोघांतील दरी रूंदावली. खोत यांनी संघटनेत घराणेशाही आणल्याची टीका करून खा. शेट्टी यांनी खोत यांच्या मुलाच्या प्रचारालाही जाणे टाळले. तेव्हापासून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या होत्या.