राज्यात अल्पदरात ७५ वातानुकूलित नाट्यगृहे उभारणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 12:09 PM2023-12-30T12:09:53+5:302023-12-30T12:10:13+5:30
सांगलीत १००व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ
सांगली : राज्यात ७५ वातानुकूलित नाट्यगृहे उभारणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ही सर्व नाट्यगृहे सौरऊर्जेवर चालविणार असून रंगकर्मींना स्वस्तात उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. सांगलीत शुक्रवारी १००व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ त्यांच्या हस्ते रोवण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यवाह अजित भुरे, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, १००व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, ९९व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री सविता मालपेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांत मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. त्यासाठी ३६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. १००व्या संमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यसंस्कृतीला पुन्हा चांगले दिवस आणेल. या संमेलनाच्या राज्यभरातील कार्यक्रमांसाठी नऊ कोटी ३३ लाखांचा निधी दिला आहे. राज्यात ८६ नाट्यगृहे आहेत; पण त्यापैकी फक्त १२ सुस्थितीत आहेत. उर्वरित ठिकाणी बसवतही नाही. त्यांचा आढावा घेऊन चांगली नाट्यगृहे अल्पदरात देण्याचा प्रयत्न आहे. ३६ जिल्ह्यांत जाणता राजा नाटक सादर केले जाणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी उद्योजक गिरीश चितळे यांनी मुहूर्तमेढीचे सपत्नीक पूजन केले. भावे नाट्यगृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, इतिहासाचे अभ्यासक सदानंद कदम, शास्त्रीय गायक हृषिकेश बोडस व शाहीर देवानंद माळी यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार झाला. संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनीही मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री खाडे यांनी या संमेलनासाठी नियोजन समितीमधून १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. संयोजकांतर्फे सर्व पाहुण्यांना सांगलीची हळद, गूळ, बेदाणा, चितळे दूध व भडंग देऊन सत्कार करण्यात आला. रंगकर्मी राजेंद्र पोळ यांच्या नाट्यसंहितांचे प्रकाशन झाले.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी विविध मागण्या मांडल्या. नवोदित कलाकारांसाठी सांगलीत राहण्याची व्यवस्था, सुस्थितीतील व अल्पदरातील नाट्यगृहे, त्यांना सौरऊर्जेतून वीजपुरवठा, सांगलीतील नियोजित नाट्यगृहाला नाटककार खाडिलकरांचे नाव आदी मागण्या केल्या.