मंत्र्यांनी कान उपटले अन् फायली मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:57 PM2020-07-01T12:57:46+5:302020-07-01T12:59:23+5:30
कृषिमंत्री दादा भुसे यांनी कान उपटल्यानंतर कृषी कार्यालय मान मुरडून कामाला लागले आहे. कृषी व्यवसायासाठी परवान्याच्या फायलींची निर्गती करण्यासाठी वीस कृषी सहायकांना जुंपले आहे. यानिमित्ताने या कार्यालयातील खाबूगिरीवरच मंत्रीमहोदयांनी नेमके बोट ठेवल्याची चर्चा आहे.
संतोष भिसे
सांगली : कृषिमंत्री दादा भुसे यांनी कान उपटल्यानंतर कृषी कार्यालय मान मुरडून कामाला लागले आहे. कृषी व्यवसायासाठी परवान्याच्या फायलींची निर्गती करण्यासाठी वीस कृषी सहायकांना जुंपले आहे. यानिमित्ताने या कार्यालयातील खाबूगिरीवरच मंत्रीमहोदयांनी नेमके बोट ठेवल्याची चर्चा आहे.
परवाने म्हणजे मलिद्याचे मोठे कुरण ठरले आहे. जिल्हाभरात सुमारे दोन ते अडीच हजार दुकाने आहेत. त्यांच्या परवान्यांची प्रक्रिया वर्षभर चालते. औषधे, खते व बियाणे अशा तिहेरी परवान्यांच्या प्रस्तावांची वार्षिक संख्या किमान सात हजारांवर जाते. वजनाविना प्रस्ताव पुढे सरकतच नसल्याचा दुकानदारांचा अनुभव आहे. खरिपाच्या हंगामात हा व्यवसाय जोमात असतो. नेमक्या याचवेळी परवान्याचे घोडे अडते. मंत्री भुसे यांनी स्वत:च सुमारे ७४० प्रस्ताव निर्गतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगून, या विभागातील खाबूगिरीवर बोट ठेवले.
मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शंकर नरळे या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड चालली. पण इतके प्रस्ताव प्रलंबित असताना वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न आता चवीचवीने चर्चेत आहे. मासिक आढावा बैठकीत बियाणे, खतांची उपलब्धता, शेततळी, हरितगृहे, शेडनेट आदींचा आढावा होतो. त्यामध्ये परवान्याच्या प्रलंबित फायलींविषयी चर्चा होत नाही काय, असाही प्रश्न पुढे येतो.
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील अनेक दुकानांवर छापे टाकण्यात आले, पण कारवाई कोणावरच झाली नाही. दुकानांचे कामकाज चोख सुरु असल्याची कृषी विभागाची सोयीस्कर समजूत झाल्याचे यातून स्पष्ट होते.