मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मंत्रिपदाचे फक्त गाजर
By admin | Published: February 18, 2017 12:05 AM2017-02-18T00:05:27+5:302017-02-18T00:05:27+5:30
मानसिंगराव नाईक : काँग्रेस, राष्ट्रवादीची पाडळीत सभा; भाजप सरकारवर जोरदार टीका
शिराळा : येथील भाजपच्या आमदारांना एकाही जागेवर विजय मिळणार नाही, याची माहिती मिळाल्यानेच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता मिळवा, तुम्हाला मंत्रीपद देतो, असे गाजर दाखविले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
पाडळी (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे वाकुर्डे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आशा झिमूर व पंचायत समितीच्या पाचुंब्री गणाचे उमेदवार पौर्णिमा मोरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. माजी आ. मानसिंगराव नाईक, व ‘विराज’चे उपाध्यक्ष अशोकराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
माजी आमदार नाईक म्हणाले, समविचारी पक्ष म्हणूनच पाच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली, ती आजही कायम आहे. पाच वर्षांत अत्यंत पारदर्शक कारभार केला आहे.
सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. विरोधक मात्र सर्व वेळ राजकारण करत असल्याने त्यांना टीका करणे, दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय लाटणे यापेक्षा दुसरा उद्योग नाही.
सरचिटणीस देशमुख म्हणाले, दुष्काळाबाबत शिराळा तालुक्यातील ५४ गावांवर भाजपकडून अन्याय झाला आहे. ही गावे दुष्काळात होरपळत असताना येथील भाजपचे लोकप्रतिनिधी मंत्रिपदाची लॉटरी लागते का? यात मश्गुल होते. टेंभू, म्हैसाळ योजनांसारखी वाकुर्डे योजनेच्याही वीज बिलात शेतकऱ्यांना सूट का दिली जात नाही?
चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. नारायण चव्हाण, विजय झिमूर, विजयराव नलवडे, विराज नाईक, के. डी. पाटील, आशाताई झिमूर व पौर्णिमा मोरे यांचे मनोगत झाले. बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, प्रमिला पाटील, राजाराम मोरे, तानाजी कुंभार, भानुदास पाटील, रूपाली पाटील, अशोक पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
पाडळी (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना माजी आमदार मानसिंंगराव नाईक. यावेळी सत्यजित देशमुख, अशोकराव पाटील उपस्थित होते.