प्रियकराकडून लग्नास नकारामुळे अल्पवयीन प्रेयसीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:22 PM2020-02-14T16:22:17+5:302020-02-14T16:24:36+5:30
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ ते साडेअकराच्यादरम्यान घडली. याबाबत मृत मुलीच्या वडिलांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कवठेमहांकाळ : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ ते साडेअकराच्यादरम्यान घडली. याबाबत मृत मुलीच्या वडिलांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी संशयित प्रियकर स्वप्नील संजय पवार (वय ३०, रा. जाखापूर, ता. कवठेमहांकाळ) याच्याविरोधात अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कवठेमहांकाळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील संबंधित अल्पवयीन मुलगी तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. बुधवार, दि. १२ रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेला गेली. तिला स्वप्नील पवार याच्या गाडीवरून जाताना काहींनी पाहिले.
याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी बुधवारी रात्री तिला विश्वासात घेऊन तू कुणाच्या गाडीवरून फिरत होतीस अशी विचारणा केली. त्यावर तिने मी स्वप्नील पवार याच्या गाडीवरून फिरत होते. तो माझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगितले. यावर कुटुंबियांनी तिला समजावून सांगितले. त्याचवेळी तिने संशयित स्वप्नील यास मोबाईलवर फोन करून माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? अशी विचारणा केली. त्यावर स्वप्नीलने माझा काही संबंध नाही, मी लग्न करू शकत नाही असे सांगून फोन ठेवून दिला.
यानंतर गुरुवार, दि. १३ रोजी सकाळी संबंधित मुलगी घरातून निघून गेली. कुटुंबीय तिचा शोध घेत असताना संशयित स्वप्नील व त्याचा चुलत भाऊ हे तिला गाडीवरून घेऊन गावात आले. त्यांनी मुलीने स्वप्नील पवार याच्या पोल्ट्रीमध्ये येऊन विषारी द्रव्य प्राशन केल्याचे सांगितले. यावेळी संबंधित मुलगी बेशुद्धावस्थेत होती. नातेवाईकांनी तिला तात्काळ कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.