Sangli: अल्पवयीन पत्नी गर्भवती; पतीस २० वर्षांची सक्तमजुरी, इस्लामपूर न्यायालयाने सुनावली शिक्षा
By हणमंत पाटील | Published: January 23, 2024 01:17 PM2024-01-23T13:17:28+5:302024-01-23T13:18:38+5:30
इस्लामपूर : परजिल्ह्यातून वाळवा तालुक्याच्या एका गावातील नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार ...
इस्लामपूर : परजिल्ह्यातून वाळवा तालुक्याच्या एका गावातील नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार केल्याच्या खटल्यातील आरोपीस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
वैभव नंदकुमार लोंढे (२४, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी धरून शिक्षा दिली. त्याने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. आरोपीविरुद्ध फिर्याद देतेवेळी पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गरोदर राहिली होती. फिर्यादीतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी वैभव लोंढे याने अल्पवयीन पीडित मुलीशी मैत्री झाल्यानंतर तू मला खूप आवडतेस, आपण दोघे लग्न करूया, असे वरचेवर म्हणत होता. त्यावेळी पीडित मुलगीही त्याला मी अजून लहान आहे, आपण असे करणे योग्य नाही, असे समजावून सांगत होती.
मात्र तरीही आरोपी वैभव लोंढे याने तिला एप्रिल २०२० मध्ये भेटण्यासाठी बोलावून घेतले. तेथून त्याने मुलीस दुचाकीवर घेऊन स्वत:च्या घरी डांबून ठेवले. मोबाइल काढून घेतला. मला येथे राहायचे नाही, हे सांगितल्यावर त्याने माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर तुझी बदनामी करेन, तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले. भीतीमुळे पीडित मुलगी तेथेच थांबली. १४ एप्रिल २०२० रोजी लोंढे याने कलंकेश्वर मंदिरात मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.
चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण
पीडितेच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची वर्दी पोलिसात दिल्यानंतर वैभव हा पीडितेस चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करत होता. हा त्रास असह्य झाल्यावर पीडित मुलीने कुटुंबीयांशी संपर्क साधत पोलिसात धाव घेतली. सहायक निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील रणजित पाटील यांनी ४ साक्षीदार तपासले. सर्वांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, हवालदार सुनील पाटील, संदीप शेटे यांनी खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षाला मदत केली.