मिरजेतील डॉक्टरांचा बंद मागे
By admin | Published: November 4, 2014 10:19 PM2014-11-04T22:19:02+5:302014-11-05T00:09:38+5:30
मारहाण प्रकरण : आज काळ्या फिती लावून निषेध करणार
मिरज : मिरजेतील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवानंद सोर्टुर यांना मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी उद्या (बुधवारी) बंद रद्द करून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हाधिकारी व पोल्
ाीस अधीक्षकांना निवेदन देऊन डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे.
महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हलगर्जीपणाचा आरोप करीत डॉ. शिवानंद सोर्टुर व त्यांच्या सहाय्यक डॉक्टरांना मारहाण केली. मारहाणीच्या घटनेबद्दल डॉ. शिवानंद सोर्टुर यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून, वैद्यकीय संरक्षण कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडियन मेडिकल असो-सिएशनच्या बैठकीत डॉक्टरांना मारहाणीचा निषेध व मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील सर्व वैद्यक व्यावसायिकांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता. खासगी दवाखाने, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानी बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली होती. डॉक्टरांच्या बंदविरोधात आरग ग्रामस्थांनी सोमवारी बंद पाळून गावातून निषेध मोर्चा काढला.
दरम्यान, डॉक्टरांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय रुग्ण हक्क समितीने विरोध दर्शवून, बंदविरोधात समितीतर्फे श्रीकांत चौकातून प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचे जाहीर केले. रिपाइंने डॉक्टरांच्या आंदोलनाला विरोध करून रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली.
आंदोलन, प्रतिआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्याचा बंद रद्द करून काळ्या फिती लावून घटनेचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)
गैरसोय टाळणार : कुरेशी
वैद्यकीय व्यावसायिक व समाज यात दुरावा निर्माण होऊ नये व परगावातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डॉक्टर काळ्या फिती लावून निषेध करतील. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय कुरेशी यांनी सांगितले.