मिरज सिव्हिलमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर गोंधळ_नातेवाईक संतप्त : डॉक्टरवर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 07:56 PM2018-05-24T19:56:07+5:302018-05-24T20:12:36+5:30
मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये (सिव्हिल) बुधवारी रात्री उपचारासाठी आलेल्या वैशाली शैलेंद्र कांबळे (वय ३६, रा. तानंग) या महिलेचा मृत्यू झाला. उपचार करण्यात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे वैशाली यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत
मिरज : मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये (सिव्हिल) बुधवारी रात्री उपचारासाठी आलेल्या वैशाली शैलेंद्र कांबळे (वय ३६, रा. तानंग) या महिलेचा मृत्यू झाला. उपचार करण्यात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे वैशाली यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाईकांच्या आंदोलनानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
वैशाली कांबळे या रात्री पोटात व छातीत वेदना होत असल्याने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये आल्या होत्या. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी दाखल करून न घेता, औषधे देऊन परत पाठविले. मात्र छातीतील वेदना सहन न झाल्याने वैशाली कांबळे यांना मध्यरात्री पुन्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यावेळीही ड्युटीवरील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार न करता सहाय्यक डॉक्टरांनी जुजबी उपचार केल्याची तक्रार आहे. वैद्यकीय तपासण्या सुरू असतानाच वैशाली कांबळे यांचा मृत्यू झाला. कांबळे यांच्या मृत्यूमुळे नातेवाईक संतप्त झाले. उपचार करण्यास डॉक्टरांनी टाळाटाळ केल्यानेच वैशाली यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे डॉ. महेश कांबळे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. वैशाली कांबळे यांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करुन, सिव्हिलच्या चौकशी अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मृताच्या नातेवाईकांना दिले. सुमारे सहा तासानंतर दुपारी वैशाली कांबळे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
वैशाली कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक दुर्घटना विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक शिंदे यांना कार्यमुक्त करण्यात आले. रूग्णावर उपचाराबाबत हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने डॉ. शिंदे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अधिष्ठातांकडे पाठविण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयाच्या चौकशी समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करून, संबंधित डॉक्टर दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता भोसले यांनी सांगितले.
डॉक्टरांनी उपचारास टाळाटाळ केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.