मिरजेत शहनाई, सतार, तबलावादनाने रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:06 PM2019-04-03T23:06:59+5:302019-04-03T23:07:07+5:30
मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, शहनाईवादन, सतारवादन, तबलावादनाने मैफल ...
मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, शहनाईवादन, सतारवादन, तबलावादनाने मैफल रंगली. किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादकांना श्रोत्यांची दाद मिळाली.
अब्दुल करीम खाँ संगीत सभेच्या पहिल्यादिवशी दुसऱ्या सत्राचा प्रारंभ सदाशिव मुळे यांच्या शहनाई वादनाने झाला. मुळे यांनी राग हंस ध्वनी आळविला. त्यांना संदेश खेडेकर यांनी समर्पक तबलासाथ केली. श्रीमती श्रुती देशपांडे (पुणे) यांनी राग चंद्र कंस आळविला. विलंबित एकतालात व द्रुत त्रितालात त्यांनी चीजा सादर केल्या. त्यांना पंडित अनंत केमकर यांनी हार्मोनियमसाथ व पंडित माधव मोडक यांनी तबलासाथ केली. उस्ताद रफिक खान (धारवाड) यांनी सतारवादन केले. त्यांनी सतारीवर राग रागेश्री आळविला. त्यांना शैलेश शेनॉय यांनी तबलासाथ केली. पंडित व्यंकटेशकुमार (धारवाड) यांनी राग बिहाग गायिला. तीनताल मध्यलयीत त्यांनी बंदिश सादर केली. त्यांना महेश देसाई यांनी तबलासाथ व पंडित सुधांशू कुलकर्णी यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित रवी चारी (मुंबई) यांनी सतारवादन केले. त्यांनी सतारीवर राग बागेश्री सादर केला. त्यांना हरमितसिंग यांनी तबलासाथ केली. श्रीमती मंजिरी असनारे-केळकर (नाशिक) यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग भिन्न षडज् आळविला. त्यांना सारंग सांभारे यांनी हार्मोनियमसाथ व श्रीकांत भावे यांनी तबलासाथ केली.
अजिंक्य जोशी (पुणे) यांचे सोलो तबलावादन झाले. त्यांनी त्रितालात तबलावादन केले. कायदा, तुकडा, रेला या तबल्याच्या विविध स्वरछटा त्यांनी सादर केल्या. त्यांना सागर कुलकर्णी यांनी लेहरासाथ केली. श्रीमती गायत्री जोशी (पुणे) यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग जोगकंस सादर केला. त्यांना सागर कुलकर्णी यांनी हार्मोनियमसाथ व अजिंक्या जोशी यांनी तबलासाथ केली. पंडित कल्याण अपार (पुणे) यांचे शहनाईवादन झाले. त्यांनी शहनाईवर राग ललत आळविला. त्यांना हार्मोनियमसाथ संदीप तावरे यांनी व मनमोहन कुंभारे यांनी तबलासाथ केली. श्रीमती सुचेता आठलेकर (मुंबई) यांचे शास्त्रीय गायन झाले. आठलेकर यांनी राग मियाकी तोडी सादर केला. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियम व प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ केली.
गायन-वादनाचा हा कार्यक्रम पहाटेपर्यंत रंगला. दर्गा सरपंच अब्दुल अजीज मुतवल्ली, बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मजीद सतारमेकर यांनी संयोजन केले. संगीत सभेस श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला.