मिरजेत आरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन
By admin | Published: January 25, 2016 12:58 AM2016-01-25T00:58:09+5:302016-01-25T00:58:09+5:30
कुंपण भिंतीवरून उडी : पोलिसांसह नागरिकांनी पाठलाग करून पुन्हा केले जेरबंद
मिरज : मिरजेत मोबाईल दुकान फोडल्याच्या प्रकरणातील संशयित बापू दिलीप काळे याने पोलीस ठाण्याच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. पोलीस व नागरिकांनी पाठलाग करून काळे यास पुन्हा जेरबंद केले. आरोपीस न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली.
मिरजेतील हायस्कूल रस्त्यावरील स्कायलाईन मोबाईल शॉपी फोडून साडेतीन लाखांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या सांगलीतील बापू दिलीप काळे, अजय कांबळे (रा. जुना बुधगाव रस्ता सांगली) यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. अजय कांबळे व बापू काळे यांना रविवारी सकाळी
११ वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार होते. न्यायालयात नेण्यापूर्वी बापू काळे याने, उलटी येत असल्याचा बहाणा केला. उलटी करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहाकडे नेण्यात आले. उलटी करण्याचे नाटक करीत काळे याने अचानक कुंपणभिंतीवरून उडी मारून पलायन केले. काळे याच्या पलायनामुळे पोलिसांची धावपळ उडाली. बापू काळे पोलीस ठाण्यामागील मंगल टॉकीजनजीकच्या बोळातून गुरूवार पेठेतील आठवडा बाजारात शिरला. पोलीस व नागरिकांनी त्याचा पाठलाग करीत आरडा-ओरडा केल्याने मुबारक बागवान या भाजी विक्रेत्याने बापू काळे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीच्या पलायनामुळे चांगलीच दमछाक झालेल्या पोलिसांना आरोपी पुन्हा सापडल्याने हायसे वाटले. आरोपी अजय कांबळे व बापू काळे यांना न्यायालयाने दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.