मिरजेत पोलीस ठाण्यावर दगडफेक
By admin | Published: March 6, 2016 10:55 PM2016-03-06T22:55:47+5:302016-03-07T00:39:14+5:30
दोघांना अटक : पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
मिरज : तुरुंगात असलेल्या आरोपीची भेट घेऊ देण्याची मागणी करीत मिरजेत मतीन काझी समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून दगडफेक केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा गांधी चौक पोलिसांनी दाखल केला आहे.
रिपाइं पदाधिकारी अस्लम बाडवाले यांच्यावर तलवार हल्लाप्रकरणी मिरजेतील एम. डी. गु्रपचा प्रमुख मतीन काझी ऊर्फ मतीन डॉन यास पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांपूर्वी त्याची सांगली कारागृहात रवानगी झाली आहे. कारागृहात भेटण्यास गेलेल्या मतीन काझी याच्या समर्थकांना त्याची भेट मिळाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या इसरार बारगीर (वय २८) व वसीम खतीब (वय २८, दोघे रा. मिरज) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. मतीन यास भेटण्यासाठी आम्हालाही कारागृहात पाठवा, अशी मागणी करीत दगडफेक केली. दगडफेकीत पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटल्या. याठिकाणी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचेही सांगण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी आगीच्या घटनेमुळे ठाण्यात अनुपस्थित असताना, हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)