मिरजेत गायन, वादनाने संगीत सभेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:17 PM2019-04-06T16:17:33+5:302019-04-06T16:18:13+5:30
मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, व्हायोलिन, बासरी, सतार व तबला-पखवाज जुगलबंदी रंगली. गायन, वादनाने रंगलेल्या तीनदिवसीय संगीत सभेचा
मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, व्हायोलिन, बासरी, सतार व तबला-पखवाज जुगलबंदी रंगली. गायन, वादनाने रंगलेल्या तीनदिवसीय संगीत सभेचा समारोप झाला.
पंडित विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने तिसºया दिवशी संगीत सभेचा प्रारंभ झाला. सोनार यांनी राग जोग आळविला. त्यांना उस्ताद फजल कुरेशी यांनी तबलासाथ, पंडित भवानी शंकर यांनी पखवाजसाथ केली. श्रीमती कल्पना झोरकर यांनी राग रागेश्री गायिला. त्यांना तबलासाथ माधव मोडक व हार्मोनियमसाथ सारंग सांभारे यांनी केली. उस्ताद फजल कुरेशी व पंडित भवानी शंकर यांची तबला-पखवाज जुगलबंदी रंगली. त्यांना लेहरासाथ योगेश रामदास यांनी केली. श्रीमती रिटा देव यांनी राग मालकंस गायिला त्यांना हार्मोनियमसाथ पंडित अनंत केमकर व तबलासाथ अंगद देसाई यांनी केली.
संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या जमुना के तीर या प्रसिध्द भैरवीच्या ध्वनिमुद्रिका एकवित तीनदिवसीय संगीत सभेचा समारोप झाला. दर्गा सरपंच अजिज मुतवल्ली, सुरेश कपिलेश्वरी, बाळासाहेब मिरजकर, मजीद सतारमेकर, फारूख सतारमेकर यांनी संयोजन केले.