मिरजेत कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर

By admin | Published: July 12, 2015 11:18 PM2015-07-12T23:18:26+5:302015-07-13T00:35:35+5:30

महापालिकेचे दुर्लक्ष : रस्त्यावर कचरा जाळण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Mirage waste at Depot's Garbage Road | मिरजेत कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर

मिरजेत कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर

Next

मिरज : महापालिकेच्या मिरज-बेडग रस्त्यावरील कचरा डेपोत मोठ्याप्रमाणात कचऱ्याचा साठा झाल्यामुळे कचरा रस्त्यावर टाकण्यात येत आहे. रस्त्यावर टाकलेला कचरा दररोज जाळण्यात येत असल्याने, धुरामुळे येथील नागरिक हैराण आहेत. महापालिका आरोग्य विभागाने कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावून कचरा डेपो बंदिस्त करण्याची त्यांची मागणी आहे.
मिरज-बेडग रस्त्यावर महापालिकेचा कत्तलखाना व कचरा डेपो आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या डेपोतील कचरा व दुर्गंधीचा त्रास येथील मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. कचऱ्याचा मोठा साठा असल्याने कचरा घेऊन येणारी वाहने रस्त्यावरच कचरा टाकतात. रस्त्यावरील कचरा पेटविण्यात येत असल्याने या परिसरात मोठ्याप्रमाणात धूर होतो.
बेडग आडवा रस्ता परिसरातील नागरिकांनी वारंवार हा कचरा डेपो हटविण्याची व बंदिस्त करण्याची मागणी केली आहे. डेपोत कचऱ्याच्या गाड्या आत प्रवेश करण्यास जागा नसल्याने रस्त्यालगतच कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा डेपोत वाहन आत नेण्यासाठी जागा नसल्याने अडचण होत आहे. दोन वर्षापूर्वी कचऱ्याच्या गाडीखाली सापडून महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कत्तलखाना व जैविक कचरा भस्मिकरण केंद्राची पाहणी करताना कचरा डेपो तात्पुरता झाकण्यात येतो.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची समिती किंवा आयुक्तांकडून पाहणी करण्यात येणार असल्यास महापालिका आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून रस्त्यावर पसरलेला कचरा आतील बाजूस टाकण्यात येतो. डेपोच्या रस्त्याकडील बाजूला पत्रे लावण्यात येतात. मात्र इतरवेळी कचऱ्याच्या ढिगाची योग्यप्रकारे विल्हेवाट न लावता, या परिसरात मोठ्याप्रमाणात प्रदूषण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Mirage waste at Depot's Garbage Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.