मिरज-बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेस सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 07:09 PM2024-09-04T19:09:48+5:302024-09-04T19:10:07+5:30
मिरज : मध्य रेल्वेच्या मिरज ते बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेसचा (क्र. २०४७६) मंगळवारपासून मिरजेतून प्रारंभ झाला. मिरजेत भाजपचे नेते सुशांत ...
मिरज : मध्य रेल्वेच्यामिरज ते बिकानेर साप्ताहिक एक्सप्रेसचा (क्र. २०४७६) मंगळवारपासून मिरजेतून प्रारंभ झाला. मिरजेत भाजपचे नेते सुशांत खाडे, प्रभाकर पाटील व रेल्वे विभागीय सहायक व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही एक्सप्रेस मिरज स्थानकातून बिकानेरला रवाना झाली.
मिरज ते बिकानेर एक्सप्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार करण्यात आला असून प्रत्येक मंगळवारी ही गाडी मिरजेतून बिकानेरला जाणार आहे. मिरज-बिकानेर एक्सप्रेसचा विस्तार करण्यासाठी माजी खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी पाठपुरावा केला होता. ही एक्सप्रेस मिरजेतून दर मंगळवारी दुपारी २:२० वाजता, सांगलीतून दुपारी २:४० वाजता, किर्लोस्करवाडी येथून दुपारी ३ वाजता सुटेल.
दुसऱ्या दिवशी बिकानेर येथे रात्री ८:४० वाजता पोहोचेल. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना राजस्थानला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध झाली आहे. या गाडीचा मिरज-पुणे हा विशेष दर्जा काढून नियमित क्रमांकाने ही गाडी धावणार आहे. यामुळे तिकिटासाठी विशेष शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या पैशाचीही बचत होणार आहे.
मिरजेत उद्घाटनप्रसंगी रेल्वे कृती समितीचे उपाध्यक्ष गजेंद्र कल्लोळी, ओंकार शिखरे, ज्ञानेश्वर पोतदार, राजेश कुकरेजा, रेल्वे प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे व रेल्वे प्रवासी उपस्थित होते. आठवड्यातून एकदा धावणारी ही गाडी किमान तीन दिवस धावावी यासाठी रेल्वेकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितले.