दीड कोटी कर्जाच्या आमिषाने मिरजेत सराफाला ४० लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:54+5:302021-02-25T04:33:54+5:30
मिरज : व्यवसायासाठी बँकेकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील रमेश विरभद्र किवटे (वय ४९, ...
मिरज : व्यवसायासाठी बँकेकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील रमेश विरभद्र किवटे (वय ४९, रा. नदीवेस, कुरणे गल्ली, मिरज) या सराफास कर सल्लागारासह चार जणांनी ४० लाखाचा गंडा घालला. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुण्यातील एका संशयितास अटक करण्यांत आली.
सराफ रमेश किवटे यांना दीड कोटीचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून मिरजेतील कर सल्लागार सचिन व्यंकटेश देशपांडे (रा. शिवाजीनगर, मिरज), अजय पवार उर्फ अभिषेक भंडारे, श्रीमती प्रियांका शेट्टी (दोघे रा. मेंगलोर) व मिथुल कन्नूभाई त्रिवेदी (रा. भाटीया अपार्टमेंट, पार्क रेव्हेन्यू, औंध, जि. पुणे) यांनी ४० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार आहे. सराफ रमेश किवटे यांना व्यवसायासाठी एक कोटी रुपये कर्जाची गरज होती. किवटे यांना कर सल्लागार सचिन देशपांडे यांनी एचएसबीसी बँकेकडून दीड कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी बँक मॅनेजर असल्याचे सांगणाऱ्या अजय पवार नामक व्यक्तीस भेटविले. सचिन देशपांडे याच्यासह अन्य तिघांनी मोबाईलवर बँकेचे कर्ज मंजूर झाल्याचे खोटे एसएमएस पाठविले. मार्च २०१८ ते जानेवारी २०२० या दोन वर्षात कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी ८३ हजार, डिपाॅझिट ३० लाख, तारण खर्च ९ लाख, असे ३९ लाख ८३ हजार ९०० रुपये किवटे यांनी मुलगा व नातेवाईकांच्या बँक खात्यातून देशपांडे, पवार, त्रिवेदी व पवार याची सेक्रेटरी प्रियांका यांच्या खात्यावर भरले. मात्र कर्जाच्या रकमेसाठी विचारणा सुरू केल्यानंतर त्यांनी टाळाटाळ सुरू केली. अखेर किवटे यांनी पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी मिथुल कन्नूभाई त्रिवेदी या एका आरोपीस पुण्यातून अटक केली असून अन्य तिघे फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.