मिरजेत अतिक्रमणे हटाव मोहीम बारगळली

By admin | Published: January 25, 2016 01:07 AM2016-01-25T01:07:45+5:302016-01-25T01:08:46+5:30

ईदगाह रस्ता रूंदीकरणानंतर कारवाई ठप्प : प्रमुख रस्त्यांच्या रूंदीकरणाची नागरिकांची मागणी

At the Miraj, the encroachment campaign was overturned | मिरजेत अतिक्रमणे हटाव मोहीम बारगळली

मिरजेत अतिक्रमणे हटाव मोहीम बारगळली

Next

सदानंद औंधे ल्ल मिरज
मिरजेतील अतिक्रमणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पवित्रा घेत ईदगाहनगर रस्त्याचे रूंदीकरण करून अनेक वर्षाचा प्रश्न निकालात काढला. मात्र महापालिका आयुक्तांनी पुन्हा कार्यभार स्वीकारल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली असून शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण बारगळले आहे. किरकोळ अतिक्रमणे हटविण्याऐवजी महापालिकेने रखडलेल्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे.
मिरज शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेतील कारभाऱ्यांचा अडथळा, ही मिरजेतील प्रमुख समस्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेची सूत्रे तात्पुरती हाती घेतल्यानंतर मिरजेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. ईदगाहनगर रस्त्याचे रूंदीकरण पार पडले. मात्र महापालिका आयुक्त परतल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम बारगळण्याची चिन्हे आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी मार्ग, चर्च रोड, गांधी चौक ते शिवाजी चौक, गणेश तलाव ते महाराणा प्रताप चौक, किसान चौक ते शास्त्री चौक, बसस्थानक ते दर्गा मार्गे बालगंधर्व नाट्यगृह, हिरा हॉटेल ते शहर पोलीस ठाण्यापर्यंतच्या अरूंद रस्त्यांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत लहान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आराखडा मंजूर आहे, मात्र निधी नाही, कारवाईस विरोध आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशा विविध कारणांमुळे रस्ता रुंदीकरण रखडले आहे. प्रमुख रस्त्यांवर भरणारे आठवडा बाजारही वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मार्केट परिसरात फायरफायटर चौकात रस्त्यावरील हातगाड्यांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. स्टेशन चौक ते शिवाजी रोड, गांधी चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रक्रिया गेली दहा वर्षे सुरु आहे. रस्त्यावर खोकी हटविण्यात आली. मात्र गांधी चौकापर्यंत इमारतींचे जादा बांधकाम हटविण्यात आले नसल्याने विद्युत खांब रस्त्यावरच आहेत. विद्युत खांब रस्त्याकडेला हलविण्यासाठी महापालिकेने ३७ लाख रूपये महावितरणला दिले आहेत. मात्र रस्त्याकडेच्या इमारतींचे अतिक्रमण काढले नसल्याने विद्युत खांबांचा अडथळा कायम आहे. अवैध बांधकामे, अतिक्रमणे हटविण्याअभावी शिवाजी रस्त्याचे रूंदीकरण रखडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मिरजेतील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिल्यानंतर केवळ रस्त्यावरील हातगाडे व विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पवित्रा घेत ईदगाहनगर येथील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण पूर्ण केले. अनेक वर्षानंतर सुरू झालेली मिरजेतील अतिक्रमण हटाव मोहीम आता थांबल्याची चिन्हे आहेत. अतिक्रमण विरोधातील कारवाई पुन्हा सुरु होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मिरजेतील रस्त्यांची दुरवस्था व वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Web Title: At the Miraj, the encroachment campaign was overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.