मिरजेत पालकमंत्र्यांचे फलक विनापरवानगी, पालिकेच्या खुलाशाने ठाकरे गटाच्या हाती आयतं कोलित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:06 PM2023-04-01T12:06:44+5:302023-04-01T12:08:41+5:30

फलकांना पालकमंत्र्यांनी परवानगी घेतली नसल्याचे महापालिका मालमत्ता विभागाने स्पष्ट केले आहे.

Miraj Guardian Minister s flex without permission disclosure of the municipal corporation thackeray group target | मिरजेत पालकमंत्र्यांचे फलक विनापरवानगी, पालिकेच्या खुलाशाने ठाकरे गटाच्या हाती आयतं कोलित

मिरजेत पालकमंत्र्यांचे फलक विनापरवानगी, पालिकेच्या खुलाशाने ठाकरे गटाच्या हाती आयतं कोलित

googlenewsNext

मिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात विविध शासकीय महामंडळांची निर्मिती झाल्याचे फलक शहरात विविध ठिकाणी झळकविले होते; मात्र या फलकांना पालकमंत्र्यांनी परवानगी घेतली नसल्याचे महापालिका मालमत्ता विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे विनापरवाना फलकांबद्दल पालकमंत्र्यांवर कारवाईची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी केली आहे.

मिरजेत ठिकठिकाणी चाैकाचाैकांत लावलेल्या भाजपच्या जाहिरात फलकांबाबत मैगुरे यांनी, या फलकांना परवानगी दिली आहे का, अशी विचारणा महापालिकेकडे केली होती. महापालिकेचे मालमत्ता व्यवस्थापक नितीन शिंदे यांनी पालकमंत्र्यांनी लावलेल्या फलकांना मिरज विभागाने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. महापालिकेच्या नियमानुसार महापालिका इमारतीच्या २०० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकरचे फलक व जाहिरात करण्यास मज्जाव असताना निर्बंध क्षेत्रात व शहरातील प्रमुख चाैकात भाजपतर्फे विनापरवाना फलक लावण्यात आले होते.

एरवी विनापरवाना फलक लावल्यास शहराचे विद्रुपीकरण केल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी खटला दाखल करण्यात येतो; मात्र पालकमंत्र्यांनी लावलेल्या फलकांबाबत महापालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार मैगुरे यांनी केली. पालकमंत्र्यांनी विविध चाैकांत लावलेल्या ३५ फलकांची यादी व छायाचित्रे सादर करून याबाबत पालकमंत्र्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी मैगुरे यांनी केली आहे.

कारवाईबाबत दुजाभाव
खा. संजय राऊत यांच्या दाैऱ्यावेळी विनापरवाना लावलेले स्वागत फलक महापालिकेने तातडीने हटविले होते. महापालिकेने आता सत्ताधाऱ्यांच्या अवैध फलकांवरही कारवाई करावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मैगुरे यांनी सांगितले.

Web Title: Miraj Guardian Minister s flex without permission disclosure of the municipal corporation thackeray group target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.