मिरजेत घोडीच्या शिंगराचे थाटामाटात बारसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:01+5:302021-01-08T05:27:01+5:30
मिरजेत दुधाचा व्यवसाय करणारे सचिन शिरगुप्पे यांना गेल्या २० वर्षांपासून घोडा पाळण्याचा छंद आहे. शिरगुप्पे यांनी हाैसेने ...
मिरजेत दुधाचा व्यवसाय करणारे सचिन शिरगुप्पे यांना गेल्या २० वर्षांपासून घोडा पाळण्याचा छंद आहे. शिरगुप्पे यांनी हाैसेने पाळलेल्या ‘सोनू’ या नऊ वर्षांच्या घोडीला नुकतेच मादी पिलू झाले. या शिंगराचा अनोखा नामकरण सोहळा पार पडला. पिलाची जन्मकुंडली तयार करण्यात आली. ज्योतिषाने सुचविलेल्या ‘क’ या अक्षराने सुरुवात होणारे ‘कल्याणी’ असे पिलाचे नामकरण करण्यात आले.
शिरगुप्पे यांनी प्रेमाने पाळलेल्या सिंध-मारवाड जातीच्या तपकिरी रंगाच्या सोनू घोडीला मादी जातीचे शामकर्ण असलेले पांढरे शुभ्र, गोंडस पिल्लू जन्मले. पांढऱ्या रंगाच्या घोड्याला महत्त्व असल्याने शिरगुप्पे यांनी या शिंगराचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात केला. शिरगुप्पे यांची मित्रमंडळी, आप्तेष्ट, हितचिंतक, पाहुणे, शहरातील टांगेवाले, घोडे पाळणारे शाैकीन अशा पाचशेजणांनी या अनाेख्या बारशाला हजेरी लावली. सर्वांच्या उपस्थितीत आम्रखंडाचे भोजन, केक कापून कल्याणीचा नामकरण सोहळा पार पडला. पांढऱ्याशुभ्र रंगाच्या या पिलास दीड लाखाला मागणी झाली आहे. या पिलाची विक्री न करता त्याला नाचकाम तसेच वैशिष्ट्यपूर्ण चालीचे घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणार असल्याचे शिरगुप्पे यांनी सांगितले.
फाेटाे : ०५०१२०२१ मिरज १..२