मिरज, कोल्हापूर स्थानकांचा अमृतभारत योजनेत समावेश; वर्गीकरणानुसार पुनर्विकास होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 04:57 PM2023-02-03T16:57:25+5:302023-02-03T17:00:29+5:30
माॅडेल स्थानके बनविण्याची केवळ घोषणाच
मिरज : मिरज व कोल्हापूर ही दोन्ही स्थानके रेल्वेने मॉडेल स्थानक करण्याचे घोषित केले होते. गेली चार वर्षांपासून ही दोन्ही स्थानके मॉडेल स्थानके होणार म्हणून प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वांची रेल्वे अंदाजपत्रकाने निराशा केली आहे. आता सांगली, कऱ्हाड, सातारा व हातकणंगले या स्थानकांसोबत सह अमृतभारत योजनेअंतर्गत मिरज व कोल्हापूर स्थानकांची पुनर्विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
रेल्वेने यावर्षी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी दोन लाख ४१ हजार कोटींची तरतूद केली आहे. यामध्ये नवीन रेल्वेमार्गासह रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण होणार आहे. देशभरातील एक हजार २७५ रेल्वे स्थानकांचे अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार असून, त्यात मिरज व कोल्हापूर या दोन्ही मॉडेल रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे.
यामुळे ही दोन्ही माॅडेल स्थानके बनविण्याची केवळ घोषणाच ठरली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील मिरज व कोल्हापूर ही दोन्ही रेल्वे स्थानके महत्त्वाची आहेत. मिरज रेल्वे स्थानक कर्नाटक सीमेवर असल्याने मिरज रेल्वेस्थानक रेल्वे स्थानक हे मॉडेल रेल्वे स्थानक बनविण्याची घोषणा चार वर्षांपूर्वी रेल्वेने केली होती.
मात्र, आता रेल्वेने चालू अर्थसंकल्पात मिरज व कोल्हापूर ही रेल्वे स्थानके अमृत भारत योजनेअंतर्गत समाविष्ट केली आहेत. या रेल्वे स्थानकांचा या योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे.
अमृत भारत योजनेत पुणे विभागातील मिरज, पुणे, कोल्हापूर, सातारा, चिंचवड, सांगली, कराड, हडपसर, बारामती, लोणंद, आकुर्डी, तळेगाव, हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरुळी, केडगाव व शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचांही समावेश केला आहे.
या सर्व रेल्वे स्थानकांचा त्यांच्या वर्गीकरणानुसार पुनर्विकास होणार असल्याने मिरज, कोल्हापूर ही दोन्ही स्थानकांच्या विकासाची शक्यता आहे. मात्र, मॉडेल स्थानक योजना गुंडाळण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची निराशा झाली आहे.
मिरज स्थानक उत्पन्नात दुसरे
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुण्यानंतर उत्पन्न मिळवून देणारे मिरज जंक्शन हे दुसरे स्थानक आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज स्थानक व प्लॅटफाॅर्मची सुधारणा, सर्व प्लॅटफाॅर्मची लांबी, रुंदी व उंची वाढविणे, पिटलाईनचे रखडलेले काम सुरू करणे, मिरजेत गाडी पार्किंगसाठी लाईन टाकणे ही कामे होणार आहेत.