मिरज कोविड रुग्णालयात रुग्णसंख्या निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:06+5:302021-09-27T04:28:06+5:30
कोविड साथीमुळे मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाले आहे. मिरज कोविड रुग्णालय एप्रिल ते ...
कोविड साथीमुळे मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाले आहे. मिरज कोविड रुग्णालय एप्रिल ते जुलैपर्यंत फुल्ल होते. येथे सुमारे ३५० रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड व अतिदक्षता विभागात सुमारे शंभर व्हेंटिलेटर बेडची सोय आहे. मिरज कोविड रुग्णालयात प्रत्येकी सहा हजार किलोलीटर क्षमतेच्या तीन ऑक्सिजन टाक्या येथे उपलब्ध आहेत.
एप्रिलपासून सुरू झालेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने दररोज दहा हजार लिटर ऑक्सिजनचा वापर सुरु होता. जूनपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने ऑक्सिजनचा वापर दररोज आठ हजारपर्यंत कमी झाला. सप्टेंबरपासून रुग्णसंख्या कमी होत असून मिरज कोविड रुग्णालयात सध्या १५० रुग्ण दाखल आहेत. रुग्णसंख्या कमी झाली तरी अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यकता असल्याने ऑक्सिजनचा वापर सुरु आहे. जिल्ह्याचे कोविड सेंटर असल्याने येथे व्हेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी द्रवरुप ऑक्सिजनचा मागणी कायम असल्याने दररोज टॅकरने आयात सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक खाजगी कोविड सेंटर बंद झाल्याने रुग्ण मिरज सिव्हिलमध्ये येत असल्याने ऑक्सिजनची गरज कायम असल्याचे चित्र आहे. मिरज सिव्हिलचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत असून संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी येथे बाल अतिदक्षता विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.
चाैकट
हवेपासून ऑक्सिजन निर्मिती प्लँट
मिरज सिव्हिलच्या आवारात हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँटची उभारणी व चाचणी पूर्ण झाली आहे. ऑक्सिजन प्लँटपासून रुग्णालयापर्यत पाईपजोडणीचे काम पूर्ण झाले असून पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनानंतर हा प्लँट कार्यरत होणार आहे. या प्लँटमधून सिव्हिलला दररोज १२५ जंबो सिलेंडर ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.