मिरजेत महापालिकेचा कत्तलखाना सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:55+5:302021-06-25T04:19:55+5:30
मिरज : पंचायत समितीच्या विरोधानंतरही मिरजेत बेडग रस्त्यावर महापालिकेचा कत्तलखाना सुरूच आहे. यामुळे पंचायत समिती सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला ...
मिरज : पंचायत समितीच्या विरोधानंतरही मिरजेत बेडग रस्त्यावर महापालिकेचा कत्तलखाना सुरूच आहे. यामुळे पंचायत समिती सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी कत्तलखान्याला भेट देऊन कत्तलखाना बंद पाडण्याचा इशारा दिला.
मिरज-बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कत्तलखान्याला भेट देऊन पंचायत समिती व वड्डी बोलवाड ग्रामपंचायत सदस्यांनी कत्तलखाना बंद करण्याची मागणी केली.
बेडग रस्त्यावरील कत्तलखाना परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असल्याने कत्तलखाना बंद करण्यासाठी मिरज पंचायत समितीच्या सभेत अनेकदा ठराव झाले आहेत. महापालिका कत्तलखान्याच्या प्रदूषणाबाबत गेल्या तीन वर्षांपासून मिरज पंचायत समिती सभेत चर्चा होत आहे. कत्तलखान्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण आहेत. उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या जनावरांच्या अवयवांमुळे मोकाट कुत्र्यांचाही उपद्रव सुरू आहे.
येथील ग्रामस्थांच्या आंदोलनानंतरही कत्तलखान्याचे प्रदूषण व तो बंद करण्याबाबत महापालिकेचे दुर्लक्ष आहे. प्रदूषणाच्या तक्रारीमुळे शुक्रवारी पंचायत समिती मासिक सभेच्या पार्श्वभूमीवर प्रभारी सभापती अनिल आमटवणे यांच्यासह सदस्य किरण बंडगर, सतीश कोरे, विक्रम पाटील, बोलवाड सरपंच सुहास पाटील, वड्डी ग्रामपंचायत सदस्य महेबुब पटेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गुरुवारी कत्तलखान्याची पाहणी केली.
चाैकट
तक्रारीकडे दुर्लक्ष
कोरोना साथीदरम्यानही कत्तलखाना सुरू असल्याचे या वेळी निदर्शनास आले. वारंवार तक्रारी करूनही महापालिका हा कत्तलखाना बंद करीत नसल्याने कत्तलखाना बंद पाडण्याचा इशारा प्रभारी सभापती अनिल आमटवणे व बोलवाड, वड्डीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.