मिरज-निजामुद्दीन ‘सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस’ उद्यापासून धावणार, २५ तासात दिल्लीत पोहोचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:34 AM2023-08-05T11:34:14+5:302023-08-05T11:34:52+5:30
मिरजेतून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध
मिरज : मिरज ते निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान रविवार, दि. ६ पासून सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस सुरू होत आहे. यामुळे मिरजेतून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे.
पुणे ते हजरत निजामुद्दीन (क्र.१२४९३/९४) या साप्ताहिक दर्शन एक्स्प्रेसचा विस्तार मिरजेपर्यंत करण्यात आला. त्यासाठी खा. संजय पाटील यांनी पाठपुरावा केला होता. दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून दर रविवारी पहाटे ४:५० वाजता सुटेल. ही एक्स्प्रेस पुण्यात सकाळी ११ वाजता, लोणावळ्यात दुपारी १२:०५ वाजता, कल्याण येथे दुपारी ०१:२५ वाजता, वसई रोड येथे दुपारी २:२५ वाजता, वापी येथे दुपारी ३:०५ वाजता, सुरत येथे दुपारी ०४:५५ वाजता, वडोदरा येथे सायंकाळी ६:३८ वाजता, रतलाम येथे रात्री १० वाजता, कोटा येथे मध्यरात्री १:०५ वाजता पोहोचेल. त्यानंतर निजामुद्दीन स्थानकात सोमवारी सकाळी ०६:४५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक शुक्रवारी रात्री ९:४० वाजता निजामुद्दीन येथून सुटेल. त्यानंतर मिरजेत रविवारी रात्री १ वाजता पोहोचेल. राजधानी एक्स्प्रेसचा दर्जा असलेली नवीन सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस केवळ २५ तासात दिल्लीत पोहोचत असल्याने प्रवाशांनी सोय होणार आहे.
पुणे ते मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने पुण्यातील आणखी काही एक्स्प्रेस गाड्यांचा मिरजेपर्यंत विस्तार होणार आहे. या साप्ताहिक एक्स्प्रेसमुळे मिरजेतून दिल्लीला जाण्यासाठी दैनंदिन गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस, आठवड्यातून चार दिवस संपर्क क्रांती एक्स्प्रेस, साप्ताहिक कोल्हापूर- निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन यासह दर्शन एक्स्प्रेसची सोय झाली आहे. नवीन दर्शन एक्स्प्रेसचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनांनी केले आहे.