मिरज पॅटर्नचा सत्ताधारी काँग्रेसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:12 PM2018-05-13T23:12:13+5:302018-05-13T23:12:13+5:30

The Miraj Patterns hit the ruling Congress | मिरज पॅटर्नचा सत्ताधारी काँग्रेसला फटका

मिरज पॅटर्नचा सत्ताधारी काँग्रेसला फटका

googlenewsNext

सदानंद औंधे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. मिरज पॅटर्नचा फटका काँग्रेसला बसला असून, मिरजेतील काँग्रेसच्या १४ नगरसेवकांपैकी ७ जण भाजप व राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला साथ देणाऱ्या मिरजेत यावेळी काँग्रेसला इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, विवेक कांबळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांशीच संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.
पालिका निवडणुकीत मिरज नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गत निवडणुकीत मिरजेतील २४ पैकी १४ जागा इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी या मिरजेतील कारभारी नेत्यांच्या मदतीने काँग्रेसने जिंकल्या होत्या. मिरजेत यश मिळाल्याने पालिकेची सत्ता काँग्रेसला हस्तगत करणे शक्य झाले. मात्र सध्याच्या पालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचनेत मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या प्रभागांचा विस्तार झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून, अतहर नायकवडी, नाजिया नायकवडी, हसिना नायकवडी हे काँग्रेसचे तीन नगरसेवक राष्टÑवादीच्या वाटेवर आहेत. सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे, निरंजन आवटी या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक महादेव कुरणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विवेक कांबळे, मालन हुलवान हे सुध्दा काँग्रेसपासून फारकत घेण्याची चिन्हे आहेत. यामुळे मिरजेत किशोर जामदार, संजय मेंढे, बबीता मेंढे, बसवेश्वर सातपुते, धोंडुबाई कलगुटगी, बेबीताई मालगावे एवढेच निष्ठावंत नगरसेवक शिल्लक राहणार आहेत.
महापालिका निवडणुकीपूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील नगरसेवकांचा दबाव गट कार्यरत ठेवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले नगरसेवक फुटल्याने संघर्ष समितीचा प्रयोग बारगळला आहे. आरक्षण व नवीन प्रभागरचनेमुळे बसवेश्वर सातपुते व मालन हुलवान यांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. गत निवडणुकीत मिरजेत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र यावेळी काँग्रेसचे तीन व मनसे व राष्टÑवादीचा एक असे सहा नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मिरजेत झालेल्या सभेत नेत्यांनी गत निवडणुकीत मिरजेत काँग्रेसला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला होता. नगरसेवकांच्या गळतीमुळे या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटे
मिरजेतील नेत्यांनी महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांना नेहमीच धोबीपछाड दिली आहे. मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे परस्परांशी साटेलोटे असल्याने प्रभाग समिती चार नेहमीच विरोधकांकडे राहिली आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलण्याच्या मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नचा फटका मिरजेत काँग्रेसला बसण्याची चिन्हे असून, काँग्रेस उमेदवारांना माजी काँग्रेस नेत्यांशी लढत द्यावी लागणार आहे.
मिरजेतील काही नगरसेवकांनी पक्षांतर केले तरी, मिरजेतील महंमद काझी व हाफिज धत्तुरे गटाची काँग्रेसला मदत होणार आहे. मिरजेत किशोर जामदार हे काँग्रेसचे नेते असले तरी, काही नगरसेवक वगळता इतरांचा त्यांच्याशी सवतासुभा आहे.
कुंपणावरील नगरसेवक राष्ट्रवादीतून लढणार
आ. जयंत पाटील राष्टÑवादी प्रदेशाध्यक्ष झाल्याने राष्टÑवादीला फायदा झाला आहे. इद्रिस नायकवडी गटाने राष्टÑवादीशी सख्य केले आहे. अल्लाउद्दीन काझी व जुबेर चौधरी या कुंपणावर असलेल्या नगरसेवकांनी पुन्हा राष्टÑवादीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला थोडेफार बळ आले आहे.

Web Title: The Miraj Patterns hit the ruling Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.