मिरजेत पोलिसाचेच घर फोडून लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:31+5:302020-12-27T04:20:31+5:30
महादेव धुमाळ हे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नेमणुकीस आहेत. दि. २२ ते २४ डिसेंबर दरम्यान धुमाळ कुटुंबीय नातेवाइकांच्या ...
महादेव धुमाळ हे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नेमणुकीस आहेत. दि. २२ ते २४ डिसेंबर दरम्यान धुमाळ कुटुंबीय नातेवाइकांच्या विवाहासाठी परगावी गेले असताना माजी सैनिक वसाहतीत वसंतदादा कॉलनीतील त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरी कटावणीने उचकटून त्यातील एक लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
धुमाळ हे गावाहून परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर गांधी चौक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान घरापासून थोड्या अंतरावर हनुमान मंदिराजवळ घुटमळले. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा संशय आहे.
चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्याचेच घर फोडल्याने खळबळ उडाली. याबाबत गांधी चाैक पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.