मिरज-पुणे दुहेरीकरणाचे काम सप्टेंबरपासून

By admin | Published: June 30, 2016 11:29 PM2016-06-30T23:29:08+5:302016-06-30T23:32:51+5:30

निविदा प्रक्रिया पूर्ण : निधीचीही तरतूद; साडेतीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता

The Miraj-Pune double standards work from September | मिरज-पुणे दुहेरीकरणाचे काम सप्टेंबरपासून

मिरज-पुणे दुहेरीकरणाचे काम सप्टेंबरपासून

Next

मिरज : मिरज-पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामास सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. लोंढा-मिरज-पुणे या ४६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी ३ हजार ६२७ कोटी रुपये खर्चाला मान्यता मिळाल्याने, मिरज-पुणे दुहेरीकरणासाठी निविदा प्रक्रिया पार पडली आहे. तीन महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. लोंढा-मिरज दुहेरीकरणाच्या कामास प्रारंभ झाला आहे.
मिरज-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या तिपटीने वाढल्याने लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणाच्या मागणीची पूर्तता होणार आहे. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी आर्थिक तरतुदीस मान्यता मिळाल्याने कामास गती मिळाली आहे. पुणे ते मिरजदरम्यान दुहेरीकरणाच्या कामाची मध्य रेल्वेने तीन टप्प्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाची निविदा दक्षिण-पश्चिम रेल्वेने यापूर्वीच काढून कामास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरपासून पुणे येथून दुहेरीकरणाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ३ हजार ६२७ कोटी रूपये खर्चास मान्यता मिळाली आहे. मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर गाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही, गेल्या चाळीस वर्षांत महालक्ष्मी, सह्याद्री व कोयना या तीनच एक्स्प्रेस उपलब्ध आहेत. कोल्हापूर-मिरज-मुंबई मार्गावर नवीन सुपरफास्ट धावणार आहेत. मिरज ते पुणे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणानंतर पुणे, मुंबई प्रवास जलद होणार आहे. मिरज-पुणे प्रवास केवळ चार तासांत होणार आहे. दुहेरीकरणानंतर विद्युतीकरण सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


सातारा येथे स्वतंत्र कार्यालय
पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी सातारा येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार असून, सुमारे २८० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाचे नियंत्रण सातारा येथील कार्यालयातून होणार आहे.
दुहेरीकरणासाठी आवश्यकता असलेल्या ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुहेरीकरणासाठी रेल्वे उड्डाण पूल, भुयारी पूल, नदी, ओढे, नाल्यांवरील पुलांचे बांधकाम करावे लागणार आहे.

Web Title: The Miraj-Pune double standards work from September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.