मिरजेत पावसाने ड्रेनेज तुंबून पाणी नागरिकांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:32+5:302021-06-05T04:20:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये भीमनगर झोपडपट्टीत जोरदार पावसामुळे दैना उडाली. याठिकाण ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये भीमनगर झोपडपट्टीत जोरदार पावसामुळे दैना उडाली. याठिकाण ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी येथील अनेक घरात शिरले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना याचा जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. घरात शिरलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्याचे काम येथील नागरिकांना शुक्रवारी रात्रभर करावे लागले. रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे खोदलेल्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य, खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. रस्त्याचा अंदाज न आल्याने अक्षय कांबळे या तरुणाचा दोन दिवसांपूर्वी अपघात होऊन तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातच पावसाचे पाणी घरात शिरल्याने संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना याचा जाब विचारला. नगरसेवक संजय मेंढे, करण जामदार व माजी नगरसेवक चंद्रकांत हुलवान यांना पाचारण करुन खराब रस्ता, नादुरुस्त ड्रेनेज व पाण्याने भरलेले खड्डे दाखवत नागरिकांनी धारेवर धरले. नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून येथील परिस्थिती दाखवत रस्ता व ड्रेनेजमधील पाण्याच्या निचऱ्याची समस्या निकाली काढण्याच्या सूचना केल्या. नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांच्या वारंवार आश्वासनानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत.