ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे कुपवाडसह मिरज, सांगलीत; तस्करांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान
By घनशाम नवाथे | Published: February 23, 2024 12:37 PM2024-02-23T12:37:48+5:302024-02-23T12:38:57+5:30
पुणे पोलिसांनी तिघांना पकडून तपासासाठी नेले असले तरी कुपवाड पोलिसांसह गुन्हे अन्वेषणला येथील छोट्या तस्करांचे ‘नेटवर्क’ उद्ध्वस्त करण्याची गरज
घनशाम नवाथे
सांगली : मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज तपास प्रकरणात कुपवाड कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून ३०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला. कुपवाडमध्ये साठा सापडल्यामुळे ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे कुपवाडसह मिरज, सांगली परिसरांत रुजल्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी तिघांना पकडून तपासासाठी नेले असले तरी कुपवाड पोलिसांसह गुन्हे अन्वेषणला येथील छोट्या तस्करांचे ‘नेटवर्क’ उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.
सन २०११ मध्ये कुपवाडला अभिजित कोंडुसकरकडे ‘केटामाईन’चा साठा जप्त केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये कोंडुसकरचा भाऊ रवींद्र कोंडुसकर, आयुब मकानदारसह आणखी एकास एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक केली. या प्रकरणात मकानदार कारागृहात होता. कारागृहात असताना त्याने ड्रग्ज तस्करांशी ओळख वाढवली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा तस्करांच्या संपर्कात राहिला. पुण्यातील साथीदारांनी दिलेला एमडी ड्रग्जचा साठा त्याने कुपवाडमध्ये आणून ठेवला. हा साठा पुन्हा पुण्याकडे पाठवण्यात येणार होता. तत्पूर्वी पुणे पोलिसांच्या कारवाईत कुपवाड कनेक्शन उघड झाल्यामुळे मकानदार पुन्हा जाळ्यात सापडला.
मकानदारसह साथीदार अक्षय तावडे, खोलीमालक रमजान मुजावर या तिघांना पकडून पोलिसांनी पुण्याला नेले. पुणे पोलिसांनी तिघांना तपासासाठी नेले असले तरी एमडी ड्रग्ज तस्करी व विक्रीत आणखी काहीजण सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक एमडी ड्रग्जचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान गुन्हे अन्वेषणसह स्थानिक पोलिसांपुढे आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासानंतर स्थानिक पोलिसांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
एमडीच्या नशेचा बाजार
मिरज हे गांजा तस्करीच्या अनेक केंद्रांपैकी एक आहे. मिरजेत यापूर्वी कोकेन, हेरोईन, ब्राऊन शुगर तस्करीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळात एमडीच्या नशेचा बाजार सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्वस्तात मोठी नशा
कोकेन, हेरोईनच्या किमतीपेक्षा एमडीची किंमत थोडी कमी आहे. तसेच नशेचा अंमल जास्त काळ राहतो. त्यामुळे एमडीला मोठ्या शहरात पसंती दिली जाते. मेफेड्रोन हे वनस्पतीसाठी बनवलेले कृत्रिम खत आहे. मनगटावर पावडर टाकून नाकपुडीतून ओढून याची नशा केली जाते.
पुन्हा कुपवाड चर्चेत
सन २०११ मध्ये केटामाईन, २०१५ मध्ये एमडी ड्रग्ज आणि पुन्हा २०२४ मध्ये एमडी ड्रग्जमुळे कुपवाड राज्यभर चर्चेत आले आहे. त्यामुळे कुपवाड आणि परिसरात ड्रग्जची पाळेमुळे रुजल्याची शक्यता व्यक्त होत आहे.